नवी दिल्ली वृत्तसंस्था
देशाला लवकरच नवा सरन्यायाधीश (CJI) मिळणार आहे. विद्यमान सरन्यायाधीश बी. आर. गवई यांचा कार्यकाळ २३ नोव्हेंबर रोजी संपत असून, त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या निवडीसाठीची प्रक्रिया सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. परंपरेनुसार, सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशालाच पुढील मुख्य न्यायाधीशपदाची जबाबदारी दिली जाते. त्यामुळे न्यायमूर्ती सूर्यकांत हे या सर्वोच्च पदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा आहे.
केंद्रीय कायदा मंत्रालयाने लवकरच सरन्यायाधीश गवई यांना त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचे नाव सुचवण्यासाठी विनंतीपत्र पाठवण्याची तयारी केली आहे. परंपरेनुसार, सरन्यायाधीशांच्या निवृत्तीच्या सुमारे एक महिना आधी ही शिफारस मागवली जाते.
न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नियुक्ती झाल्यास ते २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारतील आणि त्यांचा कार्यकाळ सुमारे १५ महिने, म्हणजेच ९ फेब्रुवारी २०२७ पर्यंत असण्याची शक्यता आहे.
शांततेचा आदर्श दाखवणारे सीजेआय गवई
दरम्यान, सरन्यायाधीश गवई यांच्यावर ६ ऑक्टोबर रोजी न्यायालयीन कामकाजादरम्यान एका वकिलाने बूट फेकल्याची गंभीर घटना घडली होती. ७१ वर्षीय वकील राकेश किशोर यांनी ही कृती केली होती. या प्रकारानंतर बार कौन्सिल ऑफ इंडियाने त्यांच्या वकिली परवान्याचे निलंबन केले. मात्र, या हल्ल्यानंतरही मुख्य न्यायाधीश गवई यांनी शांततेचा आदर्श दाखवत न्यायालयातील कर्मचाऱ्यांना ‘घटनेकडे दुर्लक्ष करून फक्त ताकीद द्या’, असे निर्देश दिले.
या घटनेशी संबंधित अवमान कारवाईच्या याचिकेवर २७ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांचे खंडपीठ नियुक्त करण्यात आले आहे. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने या याचिकेची दाखल केली असून, ती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या शांत, संयमी आणि न्यायप्रिय कार्यशैलीमुळे सर्वोच्च न्यायालयात स्थैर्य आणि संतुलन टिकले आहे. आता त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या रूपाने न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याकडे सूत्रे जाण्याची शक्यता निर्माण झाली असून, न्यायव्यवस्थेच्या पुढील पर्वाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


