
नवी दिल्ली वृत्तसंस्था
यंदाच्या दिवाळीत देशभरात विक्रीने सर्व जुने विक्रम मोडले आहेत. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) च्या अहवालानुसार, देशभरात एकूण 6.05 लाख कोटी रुपयांचा व्यापार झाला आहे. यात वस्तू व्यापाराचा वाटा 5.40 लाख कोटी तर सेवा व्यापाराचा वाटा 65 हजार कोटी इतका आहे.
हा आकडा देशाच्या व्यावसायिक इतिहासातील सर्वाधिक असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 25 टक्क्यांनी वाढ झाल्याचे कॅटने सांगितले. गेल्या दिवाळीत 4.25 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय झाला होता.
‘व्होकल फॉर लोकल’ची लाट
कॅटचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वदेशीचा अवलंब करण्यासाठी एक मजबूत ब्रँड अॅम्बेसेडर ठरले आहेत. ‘स्थानिकांसाठी आवाज’ आणि ‘स्वदेशी दिवाळी’ या आवाहनाला जनतेने अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे.”
खंडेलवाल यांनी सांगितले की, जवळपास ८७ टक्के ग्राहकांनी भारतीय वस्तूंनाच प्राधान्य दिले असून, चिनी उत्पादनांच्या मागणीत मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत स्वदेशी वस्तूंच्या विक्रीत २५ टक्के वाढ झाली आहे.
या एकूण व्यापारात पारंपारिक आणि बिगर-कॉर्पोरेट बाजारपेठांचा वाटा तब्बल ८५ टक्के होता. त्यामुळे देशातील किरकोळ बाजारपेठा आणि लघु व्यापाऱ्यांचे मजबूत पुनरागमन अधोरेखित होते.
कोणत्या क्षेत्रात किती विक्री?
कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भारतीय यांनी सांगितले की, विविध क्षेत्रातील विक्री पुढीलप्रमाणे झाली
• किराणा आणि एफएमसीजी – १२%
• सोने-चांदी – १०%
• इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल्स – ८%
• ग्राहक वस्तू – ७%
• तयार कपडे – ७%
• भेटवस्तू – ७%
• गृहसजावट – ५%
• फर्निचर – ५%
• मिठाई आणि नमकीन – ५%
• कपडे – ४%
• पूजा साहित्य – ३%
• फळे आणि सुकामेवा – ३%
• बेकरी पदार्थ – ३%
• पादत्राणे – २%
• इतर विविध वस्तू – १९%
सेवा क्षेत्रातही मोठी वाढ नोंदवली गेली असून, पॅकेजिंग, प्रवास, कार्यक्रम व्यवस्थापन, हॉटेलिंग, टॅक्सी सेवा, सजावट, मनुष्यबळ आणि वितरण क्षेत्रात ₹65,000 कोटींचा व्यवसाय झाला आहे.
जीएसटी सुधारणा आणि वाढलेला उत्सव खर्च
खंडेलवाल यांनी नमूद केले की, जीएसटी दरांचे सुसूत्रीकरण हा ग्राहक मागणीला चालना देणारा महत्त्वाचा घटक ठरला आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ७२% व्यापाऱ्यांनी विक्रीतील वाढ जीएसटी दर कपातीमुळे झाली असे सांगितले. ग्राहकांनीही स्थिर किमतींमुळे समाधान व्यक्त केले असून, यामुळे उत्सव काळात खर्च वाढला आहे.
व्यवसाय-ग्राहक आत्मविश्वास सर्वोच्च
या वर्षी ट्रेडर कॉन्फिडन्स इंडेक्स (TCI) 8.6/10 आणि कंझ्युमर कॉन्फिडन्स इंडेक्स (CCI) 8.4/10 इतका उच्च स्तरावर पोहोचला आहे. नियंत्रित महागाई, वाढते उत्पन्न आणि अर्थव्यवस्थेवरील विश्वास यामुळे ही सकारात्मक भावना पुढील काही महिन्यांपर्यंत कायम राहील, असा कॅटचा अंदाज आहे.
५० लाख नव्या नोकऱ्या
या विक्रमी व्यापारामुळे देशभरात तब्बल ५० लाख तात्पुरत्या रोजगारांच्या संधी निर्माण झाल्या आहेत. बिगर-कॉर्पोरेट आणि बिगर-कृषी क्षेत्र देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख इंजिन ठरले असून, ग्रामीण व निमशहरी भागांचा एकूण व्यापारातील वाटा २८ टक्के इतका नोंदवला गेला आहे.
खंडेलवाल यांनी सांगितले की, “ही केवळ विक्री नाही, तर स्थानिक व्यापार, उत्पादन आणि रोजगार यांचा सण आहे. स्वदेशीचा जयघोष आता भारताच्या प्रत्येक बाजारात गुंजतो आहे.”