नवी दिल्ली वृत्तसंस्था
बँक खातेदारांसाठी केंद्र सरकारकडून एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. आता बँक खात्यात फक्त एकच नाही, तर एकावेळी चार नॉमिनी (Nominee) ठेवण्याची सुविधा मिळणार आहे. हा नवा नियम १ नोव्हेंबर २०२५ पासून देशभर लागू होणार असून, त्यामुळे ग्राहकांना नामांकन प्रक्रियेत अधिक लवचिकता मिळणार आहे.
अर्थ मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केले की, ‘बँकिंग कायदे (दुरुस्ती) अधिनियम, २०२५’ मधील प्रमुख तरतुदी १ नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. या कायद्यानुसार, कोणताही ग्राहक आपल्या बँक खात्याबरोबरच लॉकर किंवा सुरक्षित ठेवलेल्या वस्तूंकरिता जास्तीत जास्त चार नॉमिनी नियुक्त करू शकेल.
• काय आहे नवा नियम?
चार नॉमिनींचा पर्याय
ग्राहक आता आपल्या खात्यातील नॉमिनी दोन पद्धतींनी निश्चित करू शकतो.
1. क्रमिक (Sequential) नामांकन- म्हणजे, जर पहिला नॉमिनी हयात नसेल, तर दुसऱ्याला आपोआप हक्क प्राप्त होईल. लॉकर आणि सुरक्षित ठेवलेल्या वस्तूंसाठी हीच पद्धत लागू राहील.
2. एकसाथ (Simultaneous) नामांकन – खातेदार चारही नॉमिनींमध्ये ठराविक टक्केवारीने हिस्सा वाटू शकतो. उदाहरणार्थ – ४०%, ३०%, २०% आणि १०% अशा स्वरूपात एकूण १००% हिस्सा ठरवता येईल.
ग्राहक या दोन्हीपैकी कोणताही पर्याय निवडू शकतात.
• पारदर्शकता आणि दाव्यांचे जलद निपटारा
सरकारच्या म्हणण्यानुसार, या नव्या तरतुदीमुळे बँकिंग प्रणाली अधिक पारदर्शक, एकसमान आणि ग्राहकाभिमुख बनेल. बँक खात्यांवरील दावे आणि वारसाहक्क निपटारा प्रक्रियेतही गती येईल.
अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले की, “या सुधारणा ठेवीदारांना त्यांच्या संपत्तीच्या वाटणीबाबत अधिक स्पष्टता आणि सुरक्षितता देतील. तसेच वारसदारांमध्ये होणारे वादही टळतील.”
या बदलामुळे बँक खातेदारांना त्यांच्या संपत्तीचा वारस कोण असेल, हे स्वतःच्या इच्छेनुसार स्पष्टपणे ठरवण्याची मुभा मिळेल. त्यामुळे बँकिंग व्यवहार अधिक सोपे, पारदर्शक आणि खातेदारांसाठी हितकारक ठरणार आहेत.


