
नवी दिल्ली प्रतिनिधी
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मतदार याद्यांमधील पारदर्शकता आणि अचूकता सुनिश्चित करण्यासाठी “स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR)” ही मोहीम आता संपूर्ण देशभर राबवण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्तांनी सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना (CEOs) SIR ची तयारी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. दोन दिवस चाललेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर आयोगाने हा निर्णय जाहीर केला असून, या मोहिमेमुळे बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्या पडताळणीवरून गोंधळ घालणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
आयोगाच्या माहितीनुसार, प्रत्येक राज्याला मतदार याद्या अद्ययावत करण्याचे, नव्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट करण्याचे आणि अपात्र किंवा मृत व्यक्तींची नावे वगळण्याचे काम सोपवण्यात आले आहे. त्यासोबतच, घराघरांत जाऊन पडताळणी करण्याच्या मोहिमांवर आणि सार्वजनिक जनजागृती उपक्रमांवरही भर देण्यात येणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले की, “देशभरातील सर्व मुख्य निवडणूक अधिकारी आपल्या राज्यांमध्ये SIR ची अंमलबजावणी वेळेत पूर्ण करतील, याची खात्री करा.” आयोगाने गेल्या SIR नंतर झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला असून, सध्याच्या अद्ययावत आकडेवारीच्या आधारे मतदार याद्या सुधारण्याचे निर्देश दिले आहेत.
SIR म्हणजे नेमकं काय?
SIR म्हणजे Special Intensive Revision, म्हणजेच मतदार याद्यांची सर्वंकष पुनरावृत्ती आणि पडताळणी प्रक्रिया. या प्रक्रियेअंतर्गत प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मतदारांची अचूक माहिती संकलित केली जाते. उद्दिष्ट आहे,आगामी निवडणुकांसाठी त्रुटीविरहित, अचूक आणि पारदर्शक मतदार यादी तयार करणे.
निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या प्रक्रियेत दक्ष राहण्याचे आदेश दिले असून, आगामी निवडणुकांपूर्वी संपूर्ण देशात मतदार यादीतील कोणतीही त्रुटी राहू नये, याची काटेकोर खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.