
नवी दिल्ली वृत्त संध्या
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वाढत्या ऑनलाइन फसवणुकीला आळा घालण्यासाठी मेटा कंपनीने मोठे पाऊल उचलले आहे. WhatsApp आणि Instagram वरील चॅटिंग आता अधिक सुरक्षित होणार असून, युजर्सना स्कॅमपासून वाचवण्यासाठी कंपनीने नव्या सुरक्षा वैशिष्ट्यांची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे ही फीचर्स खासकरून ज्येष्ठ नागरिकांना लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहेत.
अलीकडच्या काळात ऑनलाइन स्कॅमची प्रकरणं झपाट्याने वाढली असून, त्यात मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट केले जात असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर मेटाने नव्या सुरक्षा उपाययोजना लागू केल्या आहेत.
WhatsApp वर अलर्ट फीचर
आता WhatsApp वर जर कोणत्याही युजरने अनोळखी व्यक्तीसोबत व्हिडीओ कॉलदरम्यान स्क्रीन शेअर केली, तर त्यांना त्वरित अलर्ट मिळणार आहे. हे फीचर ‘डिजिटल अरेस्ट’सारख्या स्कॅमपासून संरक्षणासाठी उपयोगी ठरणार आहे.
Messenger मध्ये AI स्कॅम डिटेक्शन टूल
Messenger साठी कंपनी एआय-संचालित स्कॅम शोधण्याचं साधन तयार करत आहे. युजर्स आपल्या नवीन संपर्कांसोबतच्या चॅट्स एआय रिव्ह्यूसाठी पाठवू शकतील आणि जर कुठलाही धोका आढळला तर योग्य सल्ला आणि सूचना मिळतील.
पासकी सपोर्ट आणि प्रायव्हसी चेकअप
मेटाने फेसबुक, मेसेंजर आणि WhatsApp साठी पासकी सपोर्ट सुरू केला आहे. युजर्स आता फेस व्हेरिफिकेशन किंवा फिंगरप्रिंटद्वारे लॉगिन करू शकतील. तसेच, कंपनीने फेसबुक व इन्स्टाग्रामवर सिक्युरिटी चेकअप आणि WhatsApp वर प्रायव्हसी चेकअप वापरण्याचे आवाहन केले आहे.
‘स्कॅम से बचो’ मोहीम लवकरच
मेटा दूरसंचार विभागाच्या सहकार्याने ‘स्कॅम से बचो’ ही विशेष मोहीम राबवणार आहे. यात ज्येष्ठ नागरिकांना व्हिडीओ कंटेंटद्वारे स्कॅम ओळखण्याबाबत आणि टाळण्याबाबत शिक्षण दिले जाईल. याशिवाय, कंपनी ‘सक्षम ज्येष्ठ’ मोहिमेला देखील समर्थन देणार आहे, जी ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल साक्षरता व सुरक्षा सत्रे आयोजित करते.
डिजिटल युगात वाढत्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर मेटाच्या या नव्या उपाययोजना निश्चितच युजर्ससाठी सुरक्षिततेचा नवा कवच ठरणार आहेत.