
दिल्ली वृत्त संध्या
दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाची दिवाळी भारतीय नौदलाच्या वीर जवानांसोबत समुद्रावर साजरी केली. स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत वर सोमवारी त्यांनी नौदल अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि देशाच्या संरक्षण सामर्थ्याचा गौरव केला.
#WATCH | Prime Minister Narendra Modi celebrates Diwali with brave armed forces personnel, at INS Vikrant off the coast of Goa and Karwar.
(Source: DD News) pic.twitter.com/LyyAtW9w4b
— ANI (@ANI) October 20, 2025
पंतप्रधान मोदी म्हणाले, “या वर्षी स्वदेशी विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतवरील नौदल कर्मचाऱ्यांमध्ये दिवाळी साजरी करण्याचा अनुभव मला लाभला, हे माझं भाग्य आहे.” त्यांनी सांगितले की, “रात्रीच्या गहि-यात समुद्राचे दर्शन आणि सकाळच्या सूर्यकिरणांनी उजळलेला क्षितिज या दृश्यांनी माझी दिवाळी अधिक संस्मरणीय केली.”
मोदी पुढे म्हणाले, “काही महिन्यांपूर्वीच आपण पाहिले की ‘विक्रांत’ या नावानेच पाकिस्तानमध्ये भीतीची लाट पसरली होती. युद्ध सुरू होण्याआधीच शत्रूचे मनोबल खचवण्याची ताकद या नावात आहे. हीच भारतीय नौदलाची शक्ती आहे.” त्यांनी जवानांना उद्देशून सांगितले, “तुमचे समर्पण आणि शौर्य पाहून मला अभिमान वाटतो. मी ते जगलो नसलो तरी मनापासून अनुभवले आहे.”
पंतप्रधानांनी या प्रसंगी आत्मनिर्भर भारत आणि ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले, “INS विक्रांत हे स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक आहे. ज्या दिवशी देशाला हा स्वदेशी विक्रांत मिळाला, त्या दिवशी भारतीय नौदलाने छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रेरित नवीन ध्वज स्वीकारला आणि गुलामगिरीचे प्रतीक मागे सोडले.”
संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनावर भर देत मोदी म्हणाले, “गेल्या दशकात आपली सशस्त्र सेना जलद गतीने स्वावलंबी बनत आहे. हजारो वस्तू आता देशांतर्गत तयार केल्या जात आहेत. गेल्या ११ वर्षांत संरक्षण उत्पादन तिप्पट झाले आहे आणि दर ४० दिवसांनी एक नवी युद्धनौका किंवा पाणबुडी भारतीय नौदलात सामील होत आहे.”
मोदींनी ब्रह्मोस क्षेपणास्त्रासह स्वदेशी संरक्षण उत्पादनांबाबतही आत्मविश्वास व्यक्त केला. “अनेक देश भारतातील तंत्रज्ञान आणि क्षेपणास्त्रे खरेदी करण्यास इच्छुक आहेत. आपण लवकरच जगातील प्रमुख संरक्षण निर्यातदार देशांपैकी एक होऊ,” असे ते म्हणाले.
सैनिकांच्या शौर्याला सलाम करत मोदी म्हणाले, “समुद्रावरच्या या जवानांनी पेटवलेले दिवे ही खरी दिवाळी आहे,देशरक्षणाची, समर्पणाची आणि स्वाभिमानाची.”