
नवी दिल्ली वृत्तसंस्था
दिवाळी म्हटलं की उत्सव, आनंद आणि भेटवस्तूंची रेलचेल. या काळात कंपनीकडून काय भेट मिळते याची उत्सुकता प्रत्येक कर्मचाऱ्याला असते. मात्र हरियाणातील गणौर येथील एका कारखान्यात कर्मचाऱ्यांना मिळालेल्या ‘दिवाळी गिफ्ट’ने मात्र त्यांच्या आनंदावर विरजण घातले. व्यवस्थापनाकडून सोनपापडीचे डबे भेट म्हणून मिळाल्याने संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी हे डबे थेट कारखान्याच्या गेटबाहेर फेकून नाराजी व्यक्त केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यावर जोरदार चर्चा रंगली आहे.
VIDEO: दिवाली का गिफ्ट देख फूटा कर्मचारियों का गुस्सा, कंपनी के गेट पर फेंके मिठाई के डिब्बे#Sonipat #viralvideo pic.twitter.com/im023X47g2
— Kapil Kumar (@KapilKumar77025) October 21, 2025
काही दिवसांपूर्वी देशभरातील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना आलिशान गाड्या, बोनस आणि महागड्या भेटवस्तू देऊन दिवाळी साजरी केली. मात्र, गणौर येथील कारखान्यातील कर्मचाऱ्यांना ‘सोनपापडीचा डबा’ हेच गिफ्ट मिळाल्याने ते चांगलेच भडकले. कर्मचाऱ्यांच्या मते, “दिवाळी हा केवळ भेटवस्तू देण्याचा सण नाही, तर तो आपुलकी आणि आदर दाखवण्याचा सण आहे. अशा तुटपुंज्या भेटी देऊन व्यवस्थापनाने आमचा अपमान केला,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी कर्मचाऱ्यांच्या संतापाला पाठिंबा दिला. “सोनपापडी ही एकाकडून दुसऱ्याकडे पास होणारी मिठाई म्हणून ओळखली जाते, आणि तीच भेट म्हणून देणं म्हणजे कर्मचाऱ्यांबद्दलचा आदर कमी असल्याचं लक्षण आहे,” असं काहींनी म्हटलं.
कारखान्याचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी या घटनेने औद्योगिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या असंतोषाकडे लक्ष वेधले आहे. “कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या भावना आणि श्रमांचा सन्मान राखला पाहिजे. भेटवस्तू ही केवळ औपचारिकता नव्हे, तर कृतज्ञतेचं प्रतीक असायला हवी,” अशी मते व्यक्त केली जात आहेत.
व्यवस्थापनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी या घटनेने कर्मचाऱ्यांमधील नाराजी उघड झाली आहे. कर्मचाऱ्यांनी फेकून दिलेले सोनपापडीचे डबे हे केवळ मिठाईचे नाहीत, तर व्यवस्थापनाच्या असंवेदनशीलतेचं प्रतीक ठरत आहेत. दिवाळीच्या उत्सवात ‘गिफ्ट’पेक्षा ‘आदर’ अधिक महत्त्वाचा असल्याचा संदेश या घटनेतून स्पष्टपणे उमटतो.