
चंदीगड
“माझी टीमच माझी खरी ताकद आहे,” असं म्हणणारे उद्योजक एम.के. भाटिया यांनी यंदाच्या दिवाळीत आपल्या कर्मचाऱ्यांवर अक्षरशः सोन्याचा वर्षाव केला आहे. सलग तिसऱ्या वर्षी भाटिया यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना गाड्यांचं गिफ्ट देत पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यंदा त्यांनी तब्बल ५१ आलिशान कार्स भेट म्हणून वाटप केल्या.
भाटिया यांच्या या खास उपक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. चमचमीत गाड्यांचा ताफा जेव्हा शहराच्या रस्त्यांवरून ‘कार गिफ्ट रॅली’च्या रूपात निघाला, तेव्हा लोकांनी मोबाईल काढून त्या क्षणांचे व्हिडिओ टिपले. कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि अभिमान स्पष्टपणे झळकत होता.
टीम म्हणजेच ताकद
भाटिया म्हणाले, “माझ्या फार्मा कंपन्यांच्या यशामागे माझ्या टीमची मेहनत, प्रामाणिकपणा आणि निष्ठा आहे. त्यामुळे त्यांना सन्मानित करणे ही माझी जबाबदारी आहे. हे केवळ गिफ्ट नाही, तर कृतज्ञतेची भावना आणि प्रेरणेचा संदेश आहे.”
भाटिया हे फार्मास्युटिकल उद्योगात अनेक वर्षांपासून कार्यरत असून त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या परफॉर्मन्स आणि पदानुसार गाड्यांचं वाटप केलं आहे.
दिवाळखोर ते १२ कंपन्यांचे मालक
एम.के. भाटिया यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. २००२ मध्ये एका मेडिकल स्टोअरचे मालक असताना ते दिवाळखोर झाले होते. मात्र, संघर्षातून उभं राहत २०१५ मध्ये त्यांनी स्वतःची फार्मास्युटिकल कंपनी सुरू केली. आज त्यांच्या तब्बल १२ कंपन्या कार्यरत आहेत.
भाटिया यांच्या या उदार वृत्तीचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. अनेक युजर्सनी लिहिलं, “असे बॉस प्रत्येकाला मिळावेत.” काहींनी तर त्यांना ‘रिअल लाइफ सांता’ अशी उपाधी दिली आहे.
दिवाळीच्या सणात कर्मचाऱ्यांना दिलेलं हे अनोखं गिफ्ट केवळ त्यांचा आनंद वाढवणारे ठरलेलं नाही, तर सकारात्मक नेतृत्वाची एक प्रेरणादायी मिसाल ठरली आहे.
थोडक्यात, एम.के. भाटिया यांनी दाखवून दिलं की, खऱ्या अर्थानं यश केवळ कमाईत नसतं, तर आनंद वाटण्यात आणि कृतज्ञतेच्या भावनेत असतं.