मुंबई : प्रतिनिधी
राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच, राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय आज जाहीर करण्यात आला. या निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी केली जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाची ही घोषणा आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी आयोगाच्या आयुक्तांनी निवडणूक कार्यक्रम, मतदार प्रक्रिया आणि आरक्षणासंदर्भातील न्यायालयीन आदेशांची माहिती दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक
राज्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले की,
“ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण आहे, त्या ठिकाणी निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्या आदेशांच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे.”
या निर्णयामुळे गेल्या काही काळापासून रखडलेल्या ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना गती मिळाली आहे.
या जिल्हा परिषदांमध्ये निवडणूक
राज्यातील तीन विभागांतील एकूण १२ जिल्हा परिषदांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
कोकण विभाग
रायगड
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
पुणे विभाग
सातारा
सांगली
कोल्हापूर
सोलापूर
मराठवाडा विभाग
छत्रपती संभाजीनगर
परभणी
धाराशिव
लातूर
या जिल्ह्यांतील पंचायत समित्यांचाही निवडणूक कार्यक्रम याच वेळापत्रकानुसार राबविण्यात येणार आहे.
मतदाराला दोन मते देणे बंधनकारक
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदानाची पद्धत स्पष्ट करताना आयुक्तांनी सांगितले की,
“प्रत्येक मतदाराला दोन मते देणे बंधनकारक असेल. एक मत जिल्हा परिषद सदस्यासाठी आणि दुसरे मत पंचायत समिती गणासाठी द्यावे लागेल.”
याशिवाय,
नामनिर्देशन अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जाईल, असेही आयोगाने स्पष्ट केले.
निवडणूक कार्यक्रम
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला सविस्तर निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे •
नोटिफिकेशन जाहीर : १६ जानेवारी २०२६
उमेदवारी अर्ज दाखल : १६ ते २१ जानेवारी २०२६
अर्जांची छाननी : २२ जानेवारी २०२६
अर्ज माघारीची अंतिम मुदत : २७ जानेवारी, दुपारी ३ वाजेपर्यंत
अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप : २७ जानेवारी, दुपारी ३.३० नंतर
मतदान : ५ फेब्रुवारी २०२६
मतमोजणी : ७ फेब्रुवारी २०२६, सकाळी १० वाजता
राजकीय हालचालींना वेग
महापालिका निवडणुकांचा प्रचार आज संपत असतानाच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे. विशेषतः ग्रामीण भागात पुन्हा एकदा प्रचार, आघाड्या-युती आणि स्थानिक प्रश्नांभोवती राजकारण केंद्रित होणार असल्याचे चित्र आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधित्व पुन्हा सुरू होण्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे.


