सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील राजकारणाला हलवून टाकणारी मोठी घडामोड घडण्याची चिन्हं दिसत आहेत. तीन दशकांहून अधिक काळ काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय राहिलेले माढ्याचे ज्येष्ठ नेते आणि सहा टर्मचे आमदार बबन शिंदे आता भाजपच्या गळाला लागणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
राष्ट्रवादीत फुट पडल्यावर शिंदे यांनी अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्या निर्णयाचा त्यांना राजकीय फटका बसल्याचे बोलले जाते. मुलाची राजकीय कारकीर्द पुढे नेण्यासाठी त्यांनी शरद पवारांच्या गटाशी पुन्हा संपर्क साधला, पण तिकिट नाकारल्यानंतर आता त्यांनी भाजपकडे वळण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे पिता-पुत्रांनी नुकतीच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली असून, त्यांच्या पक्षप्रवेशाचा निर्णय जवळपास अंतिम टप्प्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीआधीच हा प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बबन शिंदे यांनी स्वतः पुढील कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, मुलासाठी ते भाजपच्या प्रचारात सक्रीय भूमिका बजावतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याचाच फायदा घेत भाजप सोलापूर जिल्ह्यात आपली ताकद वाढवण्याच्या तयारीत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यांमध्ये शिंदे कुटुंबाचा मजबूत प्रभाव आहे. मोहिते-पाटलांना टक्कर देण्याची ताकद शिंदेंमध्ये असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे आगामी राजकीय समीकरणात भाजप शिंदेंचा वापर माढ्यातील समीकरणं पालटण्यासाठी करू शकते, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
१९९५ मध्ये पहिल्यांदा आमदारकीचा कार्यकाळ सुरू करून आजवर सहा टर्म आमदार राहिलेल्या बबन शिंदेंचा प्रवास सरपंच ते मंत्री असा झाला आहे. त्यांच्या या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी भाजप आता शिंदेंना आपल्या ताफ्यात सामील करून घेणार, अशी माहिती सूत्रांनी दिली.
राज्यात निवडणुकांचा माहोल रंगत असतानाच, दिवाळीच्या मुहूर्तावर शिंदे कुटुंबाचा भाजप प्रवेश हा सोलापूरच्या राजकारणात ‘धमाका’ ठरण्याची चिन्हं आहेत.


