
मुंबई प्रतिनिधी
राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. तब्बल ५२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अधिकृत अहवाल असून, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ३१,६२८ कोटी रुपयांचे विशेष मदत पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेज अंतर्गत आजपासून (१८ ऑक्टोबर) शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे नुकसानभरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील ३३ जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल सादर करण्यात आले असून, त्यावर आधारित नुकसानभरपाई वितरणाला हिरवा कंदील मिळाला आहे. यानिमित्ताने दिवाळीपूर्वी अनेक शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात मिळणार आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलेले हे पॅकेज राज्यातील आतापर्यंतचे सर्वांत मोठे असल्याचा दावा केला आहे. या संदर्भात झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्र सरकारकडून पूर्ण सहकार्याची ग्वाही दिली असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पूर आणि अतीवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या खात्यातील आर्थिक मदत दिवाळीपूर्वी जमा होईल, तर उर्वरित मदत ऑक्टोबरअखेरपर्यंत वितरीत केली जाईल. ही मदत थेट डीबीटी प्रणालीद्वारे केली जात असून शेती, जनावरे तसेच जीवितहानीसाठीची भरपाई यात समाविष्ट आहे.
तसेच, नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना, पशुधनहानी आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांना मदत जिल्हास्तरावरूनच दिली जाणार आहे. त्यामुळे शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्याची आवश्यकता राहणार नाही आणि मदत त्वरित व कार्यक्षम पद्धतीने वितरीत होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
या निर्णयामुळे मराठवाड्यासह राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.