
मुंबई प्रतिनिधी
भोर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा वनवास लवकरच संपण्याची चिन्हं दिसत आहेत. माजी आमदार संग्राम थोपटे यांनी रस्त्यांच्या कामांसाठी केलेल्या मागणीला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत भोर मतदारसंघातील रस्त्यांच्या निधीबाबत सविस्तर चर्चा झाली.
बैठकीदरम्यान थोपटे यांनी राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांच्या कामांसाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यावर मंत्री भोसले यांनी आश्वासन दिलं की, भोर मतदारसंघातील तीन तालुक्यांतील रस्त्यांची कामं सीआरएफ (केंद्रीय रस्ते निधी) आणि एचएएम (हायब्रीड अॅन्युईटी मेन्टेनन्स) या योजनांअंतर्गत प्राधान्याने घेतली जातील.
तसंच प्रमुख जिल्हा मार्ग व राज्य मार्गांना अधिक निधी देऊन इतर महत्त्वाच्या रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा दिला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. येत्या हिवाळी अधिवेशनात संग्राम थोपटे यांनी सुचवलेले काही रस्ते विषय म्हणून मांडण्यात येणार असल्याचंही मंत्री भोसले यांनी सांगितलं.
या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, राष्ट्रीय महामार्ग पुणे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक, दक्षिण विभाग कार्यकारी अभियंता अनुराधा भंडारे, उपअभियंता राहुल कुलकर्णी, भोरचे उपअभियंता राजेसाहेब आगळे, शाखा अभियंता योगेश मेटेकर, जिल्हा परिषदेचे अभियंता विकास कुलकर्णी आदी उपस्थित होते. बैठकीला भाजपा पदाधिकारीही हजर होते.
भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यांतील रस्तेविकासाच्या कामांना चालना मिळाल्यास, ग्रामीण भागातील संपर्क सुधारेल आणि स्थानिक विकासाला वेग येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.