मुंबई प्रतिनिधी
अमेरिकेतील कथित ‘एपस्टीन फाइल्स’ प्रकरण आणि अमेरिकेसोबतच्या व्यापार धोरणावरून देशातील राजकीय वातावरण तापले असताना, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी मुंबईत महाआंदोलन पार पडले. आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट निशाणा साधत आंबेडकर यांनी “एप्रिलपर्यंत थांबा; तुमच्या दोन रील्स बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा दिला.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात झालेल्या या आंदोलनादरम्यान “मोदी हटाव, देश बचाव” अशा घोषणा देण्यात आल्या. मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
‘सार्वभौमत्वासाठी निर्णय घ्या’
आंदोलनाला संबोधित करताना आंबेडकर म्हणाले, “देशाचे सार्वभौमत्व टिकवायचे असेल तर भाजपने कठोर निर्णय घ्यावा. आम्ही भाजपचा राजीनामा मागत नाही; सत्ता तुमचीच राहणार आहे. मात्र देशाच्या हितासाठी पंतप्रधानांनी पदाचा विचार करावा.”
कथित ‘एपस्टीन फाइल्स’मध्ये पंतप्रधानांच्या नावाचा उल्लेख असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला. या संदर्भात पारदर्शक चौकशी जाहीर करावी, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली. केंद्र सरकारने या आरोपांवर स्पष्ट भूमिका मांडावी, असे ते म्हणाले.
व्यापार करारांवर टीका
अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे देशाच्या आर्थिक हितसंबंधांना धक्का बसत असल्याचा आरोप करत आंबेडकर यांनी परराष्ट्र धोरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “भारत पुन्हा आर्थिक गुलामगिरीच्या दिशेने जात आहे. करार करताना देशहित प्रथम असले पाहिजे,” असे ते म्हणाले.
आरएसएस-इस्रायल संबंध, आखाती देशांतील भारतीयांची सुरक्षितता आणि वाढता आंतरराष्ट्रीय तणाव या मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य केले. आखाती देशांत कार्यरत भारतीयांच्या सुरक्षेबाबत केंद्राने ठोस आराखडा जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली.
सामाजिक संघटनांचा सहभाग
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीसह विविध सामाजिक संघटनांचा सहभाग होता. रेखा ठाकूर, प्रियदर्शी तेलंग, उत्कर्षा रुपवते, दिशा पिंकी शेख, सुजात आंबेडकर, चेतन अहिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, केंद्र सरकारकडून या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. राजकीय वर्तुळात मात्र या वक्तव्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसत आहेत.


