
सातारा प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱ्याने जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडवली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या त्यांच्या दौऱ्यात शिंदे यांनी थेट काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या कराड दक्षिण मतदारसंघावर डोळा ठेवला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या भागात काँग्रेसच्या तीन स्थानिक नेत्यांना शिंदे यांनी गळाला लावल्याची माहिती समोर आली आहे.
शिंदे यांनी सातारा जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंत (बंडानाना) जगताप, काले येथील पहिलवान नाना पाटील आणि शिवाजीराव मोहिते या तिन्ही काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे तिन्ही नेते लवकरच मुंबईत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या बैठकीसाठी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक राजेंद्र यादव आणि महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी विशेष प्रयत्न केले होते.
शिंदे यांच्या या हालचालीमुळे काँग्रेसच्या गोटात चिंता वाढली आहे. कराड दक्षिणमधील शिंदेंची ही मोहीम पृथ्वीराज चव्हाण यांच्या संघटनात्मक बळावर थेट आघात मानली जात आहे. जिल्ह्यात काँग्रेस आणि शिंदे गटातील चढाओढ आता उघडपणे दिसू लागली आहे.
दरम्यान, सातारा दौऱ्यादरम्यान शिंदे यांनी मलकापूरचे माजी उपाध्यक्ष मनोहर शिंदे यांच्याबाबतही चौकशी केली. त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न झाले, मात्र संपर्क होऊ शकला नाही. मनोहर शिंदे हे काँग्रेसमधील प्रभावी कार्यकर्ते असून, ते शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चाही जिल्ह्यात रंगल्या आहेत.
राज्याच्या राजकारणात पक्षांतरे सुरू असतानाच, साताऱ्यातही या घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे काँग्रेसमधून काही नेते शिंदे यांच्या गळाला लागत असताना, दुसरीकडे शिंदे गटातील काही माजी नगरसेवकांनी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे चांगलीच हलली आहेत.
शिवसेनेचे जिल्हा समन्वयक राजेंद्र यादव यांनी सांगितले, “पक्षसंघटना बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या, प्रभावी नेत्यांशी संपर्क साधला जात आहे. त्यातूनच काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसच्या तीन नेत्यांशी भेट घेतली.”
साताऱ्यातील हा दौरा संपला असला तरी, त्याचे राजकीय पडसाद मात्र काँग्रेसच्या खेम्यात उमटताना दिसत आहेत. निवडणुकीचा धुरळा अजूनही उडालेला नसतानाच, शिंदेंनी टाकलेला हा राजकीय डाव जिल्ह्यातील पुढील समीकरणे ठरविणारा ठरू शकतो.