
सातारा प्रतिनिधी
सातारा : जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीत यंदा महिलांचा दबदबा ठरला आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ‘महिला प्रवर्गा’साठी आरक्षित ठरल्याने आणि एकूण ६५ गटांपैकी तब्बल ३३ गट महिलांसाठी राखीव झाल्याने, येत्या पंचवार्षिकीत जिल्हा परिषद सभागृहात ‘महिलाराज’ पाहायला मिळणार आहे.
सोमवारी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीत अनेक दिग्गजांचे राजकारण ढवळून निघाले आहे. जिल्हा परिषद व ११ तालुका पंचायत समित्यांच्या १३० गणांमधील अनेक गणांवर आरक्षण बदलल्याने अपेक्षित गट हुकल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
महिलांसाठी राखीव गटांची मोठी यादी
गोंदवले बुद्रुक, गुणवरे, विडणी हे गट महिलांसाठी आरक्षित झाल्याने स्थानिक दिग्गजांची समीकरणे बिघडली. हिंगणगाव गटात सर्वसाधारण महिला आरक्षण निघाल्याने धैर्यशील उर्फ दत्ता अनपट यांची संधी हुकली असली तरी त्यांच्या पत्नींचा मार्ग मात्र मोकळा झाला आहे.
फलटण मतदारसंघातील तीन गट आरक्षित झाल्याने तेथील हायव्होल्टेज लढतींना ब्रेक बसला आहे.
अनुसूचित जातींसाठी भिलार (ता. महाबळेश्वर) हा गट आरक्षित झाला असून, २०१७ मध्ये या गटावर अनुसूचित जाती महिलांचे आरक्षण होते. निवडणूक आयोगाच्या चक्रानुसार यावेळी ती जागा अनुसूचित जाती पुरुषांसाठी राखीव झाली आहे.
मागास प्रवर्गातील महिलांसाठी ९ जागा
नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी १७ गट राखीव झाले असून, त्यापैकी ९ गट महिलांसाठी आहेत. वाठार स्टेशन गट नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव ठरल्याने अनेक इच्छुकांची समीकरणे कोलमडली आहेत.
काले, विंग, कुडाळ, मल्हारपेठ, मारुल हवेली, औंध, बुध आणि कोडोली हे गट महिलांसाठी राखीव झाले आहेत. तर वर्णे, वाठार निंबाळकर, तरडगाव, निमसोड, शिरवळ, मायणी, भुईंज आणि म्हसवे या गटांत नागरिकांचा मागास प्रवर्ग लागू झाला आहे.
• सर्वसाधारण प्रवर्गातही महिलांचा वरचष्मा
सर्वसाधारण प्रवर्गाच्या ४० गटांपैकी २० गट महिलांसाठी राखीव झाले आहेत. ओझर्डे, तारळे, शेंद्रे, बिदाल, वारुंजी, कार्वे, कोपर्डे हवेली, आंधळी, मार्डी, वाठार किरोली, पुसेसावळी, एकंबे, मंद्रुळकोळे, रेठरे बुद्रुक, हिंगणगाव, बावधन, काळगाव, कुसुंबी, सातारारोड आणि पाटखळ या गटांत महिलांचा विजयमार्ग खुला झाला आहे.
• अध्यक्षपदासाठी आठ गटांत रस्सीखेच
अध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठरले असून, औंध, बुध (ता. खटाव), वाठार स्टेशन (ता. कोरेगाव), कुडाळ (ता. जावळी), कोडोली (ता. सातारा), मल्हारपेठ, मारुल हवेली (ता. पाटण), काले व विंग (ता. कराड) या गटांमधून अध्यक्षपदासाठी रस्सीखेच होणार आहे. या आठ गटांपैकी कोणत्या गटातून जिल्हा परिषदेची पुढील ‘अध्यक्ष माता’ निवडली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
• परत येऊ शकणारे दिग्गज
दीपाली साळुंखे, सुरेंद्र गुदगे, सागर शिवदास, राजेश पवार, संजीवराजे नाईक निंबाळकर, मनोज पवार, सोनाली पोळ, सुवर्णा देसाई, मंगेश धुमाळ, अरुणादेवी पिसाळ, अर्चना रांजणे, मानसिंगराव जगदाळे, सुनीता कदम, संगीता मस्कर आणि उदयसिंह पाटील-उंडाळकर या नावांची पुन्हा एन्ट्री होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
• या दिग्गजांना बसला धक्का
उदय कबुले, भीमरावकाका पाटील, वसंतराव मानकुमरे, दीपक पवार, वनिता गोरे, शिवाजंलीराजे नाईक निंबाळकर, जिजामाला नाईक निंबाळकर, अरुण गोरे, भारती पोळ, प्रदीप विधाते, कल्पना खाडे, अभय तावरे, अर्चना देशमुख, बापूराव जाधव, रमेश पाटील आणि निवास थोरात या दिग्गजांची गणिते बिघडली आहेत.
महिलांच्या वाढत्या सहभागामुळे जिल्हा परिषदेचे आगामी सभागृह अधिक रंगतदार आणि स्पर्धात्मक होणार यात शंका नाही.