
सातारा प्रतिनिधी
सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा शहरातील दिव्यांग बांधवांना मोफत व्हिल चेअरचे वाटप करण्यात आले. शिवसेनेच्या ‘८०% समाजकारण आणि २०% राजकारण’ या विचारधारेतून हा भव्य सामाजिक उपक्रम पार पडला.
हा उपक्रम शिवसेना सातारा शहर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि डॉ. अमोल शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून राबविण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी निष्ठावंत शिवसैनिक व शिवसेना शहरप्रमुख निलेश मोरे यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट देत त्यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले.
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सन्मानार्थ तलवार भेट देऊन, पेढ्याचा हार व शाल अर्पण करून त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पालकमंत्री शंभुराज देसाई, आमदार महेश शिंदे, शिवसेना सहसंपर्कप्रमुख एकनाथ दादा ओंबळे, उपजिल्हाप्रमुख विकास शिंदे, रूपेश संकपाळ, प्रणव थोरवे, प्रतिक काळे, अमोल इंगोले, पवित चोरगे, तसेच शहर व तालुक्यातील असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, समाजकारणाच्या माध्यमातून जनतेच्या सेवेत असणाऱ्या शिवसेनेच्या भूमिकेचे पुन्हा एकदा दर्शन घडले.