
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या पोलीस दलात मोठे बदल होण्याची चिन्हं दिसत आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालक (डीजीपी) पदावर असलेल्या रश्मी शुक्ला या ३१ डिसेंबर रोजी निवृत्त होत असून, त्यांच्या उत्तराधिकार्याबाबत गृहविभागाने प्रक्रिया सुरू केली आहे. या पदासाठी सात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आहेत.
राज्य शासनाने तयार केलेली ही शॉर्टलिस्ट लवकरच केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (UPSC) पाठवली जाणार आहे. आयोग या यादीतील तीन अधिकाऱ्यांची निवड करून अंतिम शिफारस राज्य सरकारकडे करेल. त्यानंतर राज्य सरकार त्यापैकी एकाची महाराष्ट्राचे पुढील पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करेल.
सात वरिष्ठ अधिकारी चर्चेत
या शॉर्टलिस्टमध्ये राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) प्रमुख सदानंद दाते, डीजीपी (कायदेशीर व तांत्रिक) संजय वर्मा, होमगार्ड्सचे कमांडंट जनरल रितेश कुमार, भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाचे डीजीपी संजीव कुमार सिंघल, राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या महासंचालक अर्चना त्यागी, नागरी संरक्षण संचालक संजीव कुमार आणि सरकारी रेल्वे पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे या सात अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
सदानंद दाते आघाडीवर?
या अधिकाऱ्यांपैकी सदानंद दाते हे सर्वात वरिष्ठ असून, त्यांचा कार्यकाळ डिसेंबर २०२६ पर्यंत आहे. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान धैर्याने लढलेल्या दाते यांची ओळख कठोर आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून आहे. त्या वेळी अत्यल्प साधनसामग्रीत दहशतवाद्यांना तोंड देताना त्यांनी दाखवलेले शौर्य आजही पोलिस दलात आदराने स्मरले जाते.
सध्या दाते हे राष्ट्रीय तपास संस्थेचे प्रमुख आहेत. त्यांची डीजीपीपदी निवड झाल्यास त्यांना दोन वर्षांचा कार्यकाळ मिळू शकतो. मात्र, यासाठी केंद्र सरकारने त्यांना एनआयए प्रमुख पदावरून मुक्त करण्याची औपचारिक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. राज्य सरकारने त्यासंदर्भात अद्याप औपचारिक मागणी केली नसल्याचे सूत्रांकडून कळते.
दरम्यान, इतर वरिष्ठ अधिकारी, संजय वर्मा, रितेश कुमार, अर्चना त्यागी आणि प्रशांत बुर्डे, हे देखील मजबूत दावेदार मानले जात आहेत. मात्र, वरिष्ठता आणि अनुभवाच्या दृष्टीने दाते यांचे नाव सध्या चर्चेत सर्वाधिक आघाडीवर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण, सायबर गुन्ह्यांचा वाढता धोका आणि राजकीय संवेदनशीलता पाहता, नवे डीजीपी कोण असणार याकडे राज्यातील प्रशासन, पोलीस दल आणि राजकीय वर्तुळांचे लक्ष लागले आहे.