
मुंबई प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवतावादी विचार, सामाजिक न्याय आणि समतेची तत्त्वज्ञान देशभर आणि जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठात लवकरच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र’ (Dr. Babasaheb Ambedkar Chair) स्थापन होणार आहे. यासाठी मुंबई विद्यापीठ आणि केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या ‘डॉ. आंबेडकर फाऊंडेशन’ यांच्यात नवी दिल्ली येथे सामंजस्य करार (MoU) झाला आहे.
या करारावर केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या अध्यक्षतेखाली स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी मंत्रालयाचे सचिव अमित यादव, फाऊंडेशनचे सदस्य सचिव व्ही. अप्पाराव, संचालक मनोज तिवारी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, तसेच आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राच्या संचालिका प्रा. मनिषा करणे उपस्थित होत्या.
• आंबेडकरी विचारांचे संशोधन आणि प्रसारासाठी नवे व्यासपीठ
या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा शैक्षणिक, धोरणात्मक आणि सामाजिक पातळीवर प्रसार होणार आहे.
सामाजिक न्याय, मानवी हक्क, आर्थिक सक्षमीकरण आणि समानतेच्या दिशेने संशोधन, धोरणनिर्मिती आणि जनजागृतीचे काम या केंद्रातून केले जाणार आहे.
शिक्षण आणि रोजगार क्षेत्रातील धोरणांचा वंचित घटकांवर होणारा परिणाम अभ्यासणे, कौशल्य विकासाशी संबंधित योजना तयार करणे, तसेच शिक्षणातील गुणवत्ता, प्रवेश आणि समावेशकता वाढविण्यासाठी ठोस दिशा देणे हे केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे.
• ‘समाज परिवर्तनाची नव्या पिढीकडून वाटचाल’,डॉ. वीरेंद्र कुमार
केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी यावेळी म्हटले की,
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणी आणि दूरदृष्टीने भारताला दिशा दिली. आता विद्यापीठांमध्ये स्थापन होणाऱ्या अशा आंबेडकर अध्यासन केंद्रांमुळे सामाजिक न्याय, समानता आणि संविधानिक मूल्यांवरील संवाद अधिक बळकट होईल.”
त्यांनी डॉ. आंबेडकर फाऊंडेशनच्या देशभर चालू असलेल्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले.
• शैक्षणिक धोरणांमध्ये परिवर्तन घडवणारे केंद्र
केंद्रीय सचिव अमित यादव यांनी सांगितले की,
“आंबेडकर अध्यासन केंद्र हे शिक्षण, रोजगारयोग्यता आणि वंचित घटकांच्या कल्याणाशी निगडीत सार्वजनिक धोरण अभ्यासाचे केंद्रबिंदू ठरेल. आधुनिक सामाजिक आणि कायदेशीर प्रश्नांवर बहुविषयक संशोधन प्रोत्साहित करण्यासाठी विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची आहे.”
विद्यापीठ पातळीवर ऐतिहासिक पाऊल
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले की,
“या अध्यासन केंद्राच्या स्थापनेमुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक देवाणघेवाणीला चालना मिळेल. सामाजिक न्याय व समतेच्या तत्त्वांवर आधारित धोरणांची निर्मिती आणि संशोधन यातून न्याय्य आणि सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीस हातभार लागेल.”
सध्या विद्यापीठात कार्यरत असलेले ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र’ विविध उपक्रम राबवत आहे. या नव्या अध्यासन केंद्रामुळे संशोधनाचा व्याप्ती अधिक व्यापक होणार आहे.
• नवे अभ्यासक्रम आणि संशोधन प्रकल्प
या केंद्राच्या अंतर्गत एम.ए. सोशल पॉलिसी, एम.ए. बुद्धीस्ट स्टडीज, तसेच डॉक्टरेट आणि पोस्ट-डॉक्टरेट अभ्यासक्रम राबविले जाणार आहेत.
यासाठी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि दोन डॉक्टरेट फेलो नियुक्त केले जातील.
केंद्राच्या कार्यासाठी दरवर्षी ७५ लाख रुपयांचे अनुदान डॉ. आंबेडकर फाऊंडेशनकडून मंजूर करण्यात आले आहे.
• संशोधनातून सामाजिक न्यायाचा नवा युगप्रवेश
या उपक्रमामुळे मुंबई विद्यापीठ देशातील अग्रगण्य सामाजिक संशोधन केंद्र म्हणून नवा अध्याय लिहिणार आहे.
डॉ. आंबेडकरांच्या विचारसरणीवर आधारित आधुनिक समाजरचनेचा पाया मजबूत करण्याचा हा प्रयत्न असून शिक्षण, रोजगार आणि समतेच्या माध्यमातून वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचा नवा मार्ग या अध्यासन केंद्रातून तयार होईल.