
मुंबई प्रतिनिधी
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. घरांच्या वाढत्या किमतींमुळे अनेकांचे ‘मुंबईत स्वतःचं घर’ हे स्वप्न अधुरं राहतं. मात्र बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरांची विक्री प्रक्रिया जाहीर करत या नागरिकांना दिवाळीची खास भेट दिली आहे.
महापालिकेकडून विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ (DCPR 2034) मधील विनियम १५ आणि ३३(२०)(ब) अंतर्गत मिळालेल्या ४२६ सदनिकांच्या विक्रीसाठी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार असून, १६ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत नागरिकांना अर्ज करता येणार आहेत.
महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबविली जात आहे. नागरिकांना https://bmchomes.mcgm.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहेत. अर्ज प्रक्रिया १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होईल, तर अंतिम सोडत २० नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे.
दरम्यान, पात्र अर्जदारांची यादी १८ नोव्हेंबर रोजी जाहीर केली जाईल आणि सोडतीचे निकाल २१ नोव्हेंबर रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जातील.
घरांच्या सोडतीसंबंधी अधिक माहिती किंवा सहाय्यासाठी नागरिकांना ०२२-२२७५४५५३ या क्रमांकावर संपर्क साधता येईल किंवा bmchomes@mcgm.gov.in या ईमेलवर पत्रव्यवहार करता येईल, अशी माहिती बीएमसीकडून देण्यात आली आहे.
मुंबईत वाढत्या घरांच्या दरांच्या पार्श्वभूमीवर बीएमसीची ही योजना अनेकांना दिलासा देणारी ठरणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईकरांसाठी ‘घर’ हा सर्वात सुंदर आणि आशादायी भेटवस्तू ठरण्याची शक्यता आहे.