
मुंबई प्रतिनिधी
दिवाळीच्या प्रकाशोत्सवाला आता काहीच दिवस शिल्लक असताना, मुंबई पोलिसांनी नागरिकांना थेट इशारा दिला आहे, “दिवाळीत फटाक्याचा आवाज नव्हे, नियमच चालतील!”
मोठ्या आवाजाचे आणि प्रदूषण करणारे फटाके विक्रीसाठी आणणारे किंवा फोडणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई होणार आहे.
सण साजरा करण्याची उत्सुकता चहुबाजूंनी वाढली असली, तरी कानठळ्या बसवणाऱ्या फटाक्यांच्या आवाजाने त्रस्त झालेल्या नागरिकांची नाराजीही वाढत आहे. ग्रीन फटाके म्हणून ज्या फटाक्यांना परवानगी आहे, त्याच्याच मर्यादेत दिवाळीचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
• वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना दररोजचा अहवाल बंधनकारक
मुंबई पोलिस मुख्यालयातून सर्व पोलिस ठाण्यांना विशेष आदेश देण्यात आले आहेत.
१५ ते २५ ऑक्टोबर दरम्यान प्रत्येक वरिष्ठ पोलिस निरीक्षकाने आपल्या विभागातील कारवाईचा दैनंदिन अहवाल सादर करावा लागणार आहे. या अहवालात
• अवैध फटाके विक्रीविरोधात घेतलेली कारवाई
• ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन
• नागरिकांच्या तक्रारींवर झालेली तत्काळ प्रतिक्रिया
यांचा समावेश असेल.श
• सीसीटीव्हीवर ‘कडक नजर’
दिवाळीच्या काळात काही तरुण रस्त्यावर हुल्लडबाजी करताना दिसतात, विना हेल्मेट ट्रिपल सीट प्रवास, फटाके फेकणे, महिलांची छेडछाड अशा प्रकारांवर यंदा पोलिसांकडून शून्य सहनशीलतेची भूमिका घेतली जाणार आहे.
शहरातील सीसीटीव्ही नेटवर्कच्या माध्यमातून अशा मनचळ्या तरुणांवर लक्ष ठेवले जाईल, आणि पुरावे मिळताच त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील, असे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले.
• मुक्या प्राण्यांसाठी विशेष आवाहन
फटाक्यांच्या आवाजाने माणसांसोबतच प्राणीही घाबरतात, त्रस्त होतात. याबाबत प्राणीप्रेमी सुधीर कुडाळकर यांनी सांगितले की, “काही असामाजिक प्रवृत्तीचे लोक सुतळी बॉम्ब प्राण्यांच्या शेपटीला बांधतात किंवा फटाके त्यांच्यावर फेकतात. ही केवळ निर्दयता नाही, तर पशू क्रूरता प्रतिबंधक कायदा 1986 अंतर्गत दंडनीय गुन्हा आहे.”
पोलिसांनी अशा कृतींवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
• “कायद्याच्या मर्यादेतच दिवाळी साजरी करा”
मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे
“दिवाळीचा सण आनंदात साजरा करा, पण कायद्याचे उल्लंघन टाळा. फटाक्यांच्या आवाजाने किंवा प्रदूषणामुळे इतरांना, लहान मुलांना व मुक्या प्राण्यांनाही त्रास होणार नाही, याची काळजी घ्या.”
दिवाळीत ‘धडामधूम’पेक्षा शांतता आणि सजगतेचा प्रकाश झळकावा, हाच यंदाच्या पोलिसांचा ‘सुपर प्लॅन’ आहे.