
विरार प्रतिनिधी
विरार येथील शिक्षणाच्या उंबरठ्यावर उभी असताना एका तरुणीने आपलं जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना विरारमध्ये घडली आहे. विवा कॉलेजमध्ये बीकॉमच्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या रिचा पाटील (वय १९) या विद्यार्थिनीने राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, रिचा पाटील हिला तिच्याच कॉलेजमधील काही तरुणांनी अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. या प्रकरणावरून कॉलेज व्यवस्थापनाने संबंधित विद्यार्थ्यांना बोलावून समज दिली होती. त्यानंतर सर्वांना घरी जाण्यास सांगण्यात आले. मात्र कॉलेजच्या इमारतीबाहेर पडताच आरोपी तरुणाने रिचाला पुन्हा धमकी दिली आणि तिच्या आई-वडिलांबद्दलही अपशब्द उच्चारले, असा गंभीर आरोप रिचाच्या वडिलांनी केला आहे.
घरी परतल्यानंतर मानसिक तणावाखाली असलेल्या रिचाने काही क्षणांतच टोकाचं पाऊल उचललं. तीने गॅलरीतून खाली उडी मारली. गंभीर जखमी अवस्थेत तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
रिचाचे फोटो मॉर्फ करून पसरविण्याची धमकी दिल्यामुळेच तिने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी चार मुलं आणि एका मुलीविरोधात विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून कॉलेज परिसरातही संतापाची लाट उसळली आहे. रिचासारख्या विद्यार्थिनीला अशा प्रकारे जीव देण्यास भाग पाडणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.