
वसई प्रतिनिधी
नवरात्रोत्सवाच्या उत्साहात रंगलेले वातावरण दुर्दैवी प्रसंगाने अचानक काळवंडले. वसईतील ओम नगर परिसरात बुधवारी रात्री आयोजित गरबा खेळताना एका महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
मृत महिलेचे नाव फाल्गुनी शाह (४६) असे असून त्या स्थानिक रहिवासी होत्या. माहितीप्रमाणे, गरबा खेळताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. काही क्षणांतच त्या खाली कोसळल्या. उपस्थितांनी तत्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
माणिकपूर पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. प्राथमिक तपासात फाल्गुनी शाह यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे समोर आले आहे.
गरब्यातील या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नवरात्रोत्सवाच्या आनंदात सहभागी झालेल्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, आरोग्यतज्ज्ञांनी गरबा किंवा दांडिया सारख्या कार्यक्रमात सहभागी होताना पाणी पुरेसे पिणे, योग्य आहार घेणे आणि नियमित आरोग्य तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे. डिहायड्रेशनमुळेही अनेकदा अस्वस्थता आणि गंभीर समस्या उद्भवू शकतात, असे त्यांनी सांगितले.