मुंबई प्रतिनिधी
परदेशात, अनोळखी शहरात, विमान उड्डाणाला अवघे काही तास बाकी असताना पासपोर्ट हरवणे, ही कोणाच्याही काळजाचा ठोका चुकवणारी वेळ. मात्र, अशाच क्षणी मदतीला धावून येणारी यंत्रणा म्हणजे मुंबई पोलीस. त्यांच्या तत्परतेमुळे जर्मन पर्यटकाचा परतीचा प्रवास केवळ वाचलाच नाही, तर मुंबईच्या आठवणींमध्ये माणुसकीचा ठसा कायमचा उमटला.
जर्मनीचा नागरिक रायन एबर्नाऊ (२४) रविवारी रात्री साडेबारा वाजता विलेपार्ले येथून वाकोला येथील गेस्टहाऊसकडे खासगी कॅबने निघाला होता. पासपोर्ट, ओळखपत्रे आणि महत्त्वाची प्रवास कागदपत्रे असलेली छोटी बॅग त्याच्यासोबत होती. रात्री एक वाजण्याच्या सुमारास तो गेस्टहाऊसजवळ उतरला. भाडे दिले, खाली उतरला; मात्र काही क्षणांतच त्याच्या लक्षात आले. पासपोर्टची बॅग कॅबमध्येच राहिली आहे.
तोपर्यंत कॅब निघून गेली होती. सकाळी फ्लाइट असल्याने भीतीने गोंधळलेल्या अवस्थेत रायन थेट वाकोला पोलीस ठाण्यात पोहोचला. परदेशी पर्यटक, वेळेचा ताण आणि हरवलेला पासपोर्ट, प्रसंगाची गंभीरता क्षणातच ओळखून PSI तुषार मुंधे यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या.
हरविल्याची नोंद घेताच पोलीस कर्मचारी हजारे, मुन्ने आणि कोळी यांना शोध मोहिमेवर रवाना करण्यात आले. वाहतूक विभागाच्या सहकार्याने चालान प्रणालीतून कॅबची माहिती मिळवण्यात आली. त्यानंतर लाईव्ह GPS ट्रॅकिंगच्या आधारे पोलिसांचा पथक थेट अंधेरीतील त्या कॅबपर्यंत पोहोचला,वेळेवर, अचूक आणि अत्यंत संयमी पद्धतीने.
कॅब चालक संजय कुमार यादव (४०) याने मागील सीटवर बॅग सापडल्याची माहिती दिली होती. तो त्या वेळी दुसऱ्या प्रवासावर असल्याने थोडा दूर होता. मात्र पोलिसांनी प्रसंगाचे गांभीर्य समजावून सांगताच, कोणताही विलंब न करता त्याने आपले काम बाजूला ठेवले आणि अवघ्या २० मिनिटांत वाकोला पोलीस ठाण्यात हजर होऊन बॅग सुपूर्द केली.
क्षणभरापूर्वी डोळ्यांत भीती असलेल्या रायनच्या चेहऱ्यावर पासपोर्ट हातात पडताच हसू उमटलं. आनंदाने भारावलेल्या रायनने पोलिसांचे आभार मानत ‘थँक यू’ व्हिडिओही रेकॉर्ड केला. “वाकोला पोलिसांनी अवघ्या एका तासात माझा पासपोर्ट शोधून काढला. अन्यथा मी माझी फ्लाइटच गमावली असती,” असे तो भावूक शब्दांत सांगतो.
यानंतर तो थेट विमानतळाकडे रवाना झाला, आणि वेळेत जर्मनीसाठीची फ्लाइट पकडण्यात यशस्वी झाला.
या घटनेतून पुन्हा एकदा मुंबई पोलिसांचा मानवतेचा चेहरा अधोरेखित झाला आहे. कायदा-सुव्यवस्थेपुरते मर्यादित न राहता, संकटात सापडलेल्या माणसाच्या काळजीची जबाबदारी स्वीकारणारे हे पोलीस, वेगवान, तांत्रिकदृष्ट्या सज्ज आणि संवेदनशील. परदेशी पर्यटकाच्या अनुभवातूनही हेच स्पष्ट झाले की, मुंबई ही केवळ मोठी नगरी नाही, तर माणुसकी जपणारी महानगरी आहे, आणि तिचे खरे प्रतिनिधी म्हणजे मुंबई पोलीस.


