मुंबई प्रतिनिधी
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होताच राजकीय हालचालींना वेग आला असून, सत्ताधारी महायुतीत जागावाटपावरून हालचाली तीव्र झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईत पार पडलेल्या महायुतीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत, बहुतांश महापालिकांत भाजप-शिवसेना एकत्र लढण्यावर स्पष्ट सहमती झाली. विद्यमान नगरसेवक असलेल्या जागा त्या-त्या पक्षालाच देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
सूत्रांच्या माहितीनुसार, काही मोजक्या जागांची अदलाबदल होण्याची शक्यता असून, त्याबाबत अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित आहे. जागावाटपाचा तिढा अधिक गहिरा होऊ नये, तसेच त्याचा सार्वजनिक वादात रूपांतर होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
दरम्यान, जागावाटपावर शिक्कामोर्तब करण्यासाठी गुरुवारी पुन्हा एकदा महायुतीची मॅरेथॉन बैठक होणार आहे. या बैठकीत वॉर्डनिहाय सविस्तर चर्चा केली जाणार असून, दिवसभर चर्चेचे सत्र सुरू राहण्याची शक्यता आहे. एखाद्या ठिकाणी मतभेद निर्माण झाल्यास, ते थेट भाजप आणि शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठी पातळीवर सोडवण्यात येतील, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.
महापालिका निवडणुकीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहे : २३ ते ३० डिसेंबरदरम्यान नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार असून, ३१ डिसेंबरला अर्जांची छाननी होईल. २ जानेवारी ही उमेदवारी माघारीची अंतिम मुदत असून, ३ जानेवारीला चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत.
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले असून, सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मुंबईत शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी अशी महायुती एकत्र लढणार असली, तरी दुसरीकडे महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचे चित्र आहे. उमेदवारांची यादी निश्चित करण्यासाठी पुढील काही दिवस निर्णायक ठरणार आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आली असून, युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचारात विशेष भर दिला जाणार आहे. तर राज्यातील बहुतांश महापालिकांत भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असल्या, तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट लढत होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.


