
मुंबई प्रतिनिधी
कोकणातून मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. माजी मनसे नेते वैभव खेडेकर यांनी अखेर भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत खेडेकरांचा पक्षप्रवेश पार पडला. या वेळी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
या प्रवेशामुळे कोकणात भाजपची ताकद अधिक वाढणार असल्याचं मानलं जात आहे. वैभव खेडेकर हे गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अखेर आज त्यांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झालं.
मनसेतून हकालपट्टी, तीनदा रखडला प्रवेश
वैभव खेडेकर यांची काही काळापूर्वी मनसेतून हकालपट्टी करण्यात आली होती. पक्षाच्या धोरणांपासून विचलित झाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यानंतर ते शिवसेना (शिंदे गटात) जाणार अशी चर्चा रंगली होती. मात्र अखेर त्यांनी भाजपकडेच मोर्चा वळवला.
विशेष म्हणजे, तब्बल तीन वेळा त्यांचा पक्षप्रवेश पुढे ढकलला गेला होता. शेवटी आज रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी औपचारिकरित्या कमळ हाती घेतले.
मनसेच्या विस्तारात मोलाची भूमिका
खेडेकर हे कोकणातील मनसेचे जुने आणि प्रभावी नेते मानले जातात. राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पक्षाची स्थापना झाल्यापासून ते मनसेसोबत सक्रिय होते. खेड आणि आसपासच्या भागात मनसेचा पाया रुजवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांचं पक्षाशी अंतर वाढलं होतं.
राजकीय समीकरणात उलथापालथ?
खेडेकरांचा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांवरील पकड पाहता, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला याचा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दुसरीकडे, मनसेची ताकद कोकणात कमी होण्याची शक्यता आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, या प्रवेशामुळे कोकणातील राजकीय गणितं बदलू शकतात.
आता लक्ष लागलं आहे ते म्हणजे, खेडेकरांच्या भाजप प्रवेशाचा नेमका परिणाम आगामी निवडणुकांवर कसा होतो, हे येणारा काळच ठरवेल.