
खेड प्रतिनिधी
खेड तालुक्यातील जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेला जागतिक स्तरावर पोहोचवणारे दत्तात्रय वारे गुरुजी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वारे गुरुजींची बदली रद्द करून त्यांना मूळ ठिकाणीच ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी घेतला आहे. तसेच, राज्यभरातील जिल्हा परिषद शाळांच्या उन्नतीसाठीच्या कामाची जबाबदारीही वारे गुरुजींकडे सोपविण्यात येणार असल्याची घोषणा भुसे यांनी केली.
शनिवारी जालिंदरनगर आणि शिक्रापूर (वाबळेवाडी) येथील शाळांना शिक्षणमंत्री दादा भुसे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी भेट दिली. ‘टी फॉर एज्युकेशन’ संस्थेच्या जागतिक आदर्श शाळा प्रकल्पात एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळवलेल्या या शाळांनी राज्यातील जिल्हा परिषद शिक्षण व्यवस्थेचा गौरव वाढवला आहे.
वाबळेवाडी येथे लोकवर्गणीतून उभी राहिलेल्या शाळेची पाहणी केल्यानंतर, भुसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर जालिंदरनगर शाळेत वारे गुरुजींनी विकसित केलेल्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली. हा संपूर्ण कार्यक्रम राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांसाठी लाईव्ह प्रक्षेपित करण्यात आला.
“राज्यभर जालिंदरनगरसारख्या आदर्श शाळा उभ्या राहाव्यात. जिल्हा परिषद शाळांमधूनच दर्जेदार शिक्षण मिळते,”असे भुसे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “शिक्षकांचा वेळ अध्यापनातच जावा, म्हणून आता शाळाबाह्य कामे कमी करून केवळ चारच समित्यांची जबाबदारी शिक्षकांना दिली जाणार आहे.”
‘गुरुजींना चप्पल’ परत घातली!
शिक्षक दत्तात्रय वारे यांनी लोकवर्गणीतील अपहाराच्या आरोपांनंतर चप्पल घालणे बंद केले होते. मात्र, भावनिक क्षणात दादा भुसे यांनी वारे गुरुजींना त्यांच्या शिक्षक झेंडे गुरुजींच्या हस्ते, तर वडील निवृत्त शिक्षक बबनराव वारे यांच्या उपस्थितीत चप्पल परत घालून दिली. या प्रसंगाने उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आले.
चौथी-सातवी शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा सुरू
यावेळी शिक्षणमंत्र्यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. पाच वर्षांपूर्वी रद्द करण्यात आलेल्या इयत्ता चौथी आणि सातवीच्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा पुढील वर्षापासून पुन्हा सुरू केल्या जाणार आहेत. या वर्षी दोन्ही पद्धतीने, चौथी-सातवी आणि पाचवी-आठवी,परीक्षा घेतल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितलं
संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरलेल्या वारे गुरुजींना आता शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी जबाबदारी मिळणार आहे. जालिंदरनगरचा आदर्श मॉडेल राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत पोहोचविण्याचे लक्ष्य शिक्षण विभागाने निश्चित केले आहे.