
मुंबई प्रतिनिधी
शिवसेना (ठाकरे गट) चे नेते आणि पक्षाचे जाहीर प्रवक्ते असलेले खासदार संजय राऊत यांची प्रकृती आज अचानक बिघडली असून त्यांना तातडीने भांडुप येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळी नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेतल्यानंतर राऊत यांना अस्वस्थता जाणवली. त्यानंतर त्यांना तातडीने फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी या रुग्णालयात नियमित आरोग्य तपासणी केली होती.
अलीकडेच झाली होती ॲन्जिओग्राफी
मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात राऊत यांची ॲन्जिओग्राफी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर दौरा केला होता. मात्र, या दौऱ्यात त्यांना थकवा आणि अस्वस्थता जाणवू लागली होती. आज पुन्हा त्रास वाढल्याने त्यांना फोर्टिसमध्ये दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी २०१९ साली त्यांच्यावर ॲन्जिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
राजकीय व्यस्ततेतही सक्रीय उपस्थिती
राऊत हे शिवसेना (ठाकरे गट) चे तडफदार आणि धडाडीचे नेते म्हणून ओळखले जातात. भाजपसोबतची युती संपुष्टात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाविकास आघाडीचे प्रमुख धोरणकर्ते म्हणून त्यांनी सातत्याने भूमिका बजावली आहे.
दररोज सकाळी घेतल्या जाणाऱ्या त्यांच्या पत्रकार परिषदांमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण असते. सत्ताधाऱ्यांवर कठोर टीका आणि विरोधकांना उत्तर देण्यात राऊत नेहमीच आघाडीवर राहिले आहेत.
आजच्या पत्रकार परिषदेत मोठे विधान
आज सकाळच्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी राज ठाकरे आणि महाविकास आघाडी संदर्भात एक महत्त्वाचे विधान केले. “राज ठाकरे यांनाही काँग्रेससोबत एकत्र येणे गरजेचे वाटते,” असे राऊत म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर राज्यातील राजकीय चर्चांना नवीन वळण मिळाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले आहे. या चर्चांना चालना देण्यात राऊत यांनी मोलाची भूमिका निभावली असल्याचे मानले जाते.
डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत अहवाल अपेक्षित
संजय राऊत यांच्या प्रकृतीविषयी अधिकृत निवेदन अद्याप समोर आलेले नाही. मात्र, रुग्णालयातील सूत्रांनी त्यांच्या स्थिती स्थिर असल्याचे सांगितले आहे. दिवसभरात त्यांच्यावर काही आवश्यक वैद्यकीय तपासण्या होणार आहेत.