
मुंबई प्रतिनिधी
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील १९ जिल्ह्यांतील लाभार्थ्यांना यावेळी गव्हाऐवजी ज्वारीचे वितरण करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील हंगामात शासनाने ज्वारीची मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती. त्यामुळे आता अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने गव्हाचा काही हिस्सा कमी करून ज्वारी देण्याचा निर्णय घेतला आहे.
अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना नवीन वाटपप्रणाली
शासनाच्या अंत्योदय योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना साधारणपणे ३५ किलो धान्य दिले जाते, त्यात २० किलो तांदूळ आणि १५ किलो गहू असा वाटपाचा नियम आहे. परंतु नव्या निर्णयानुसार, आता २० किलो तांदूळ, साडेसात किलो गहू आणि साडेसात किलो ज्वारी असे प्रमाण राहणार आहे.
तर प्राधान्य कुटुंबातील रेशनधारकांना प्रतिव्यक्ती ३ किलो तांदूळ, १ किलो गहू आणि १ किलो ज्वारी असे धान्य मिळणार आहे.
कोणत्या जिल्ह्यांत लागू होणार हा निर्णय?
राज्याच्या खालील १९ जिल्ह्यांतील लाभार्थ्यांना या नव्या वितरण प्रणालीचा लाभ मिळणार आहे :
हिंगोली, बुलढाणा, अकोला, जळगाव, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, अहिल्यानगर, लातूर, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, वर्धा, नागपूर, संभाजीनगर, नाशिक आणि नंदुरबार.
सर्वसामान्यांमध्ये मिश्र प्रतिक्रिया
दिवाळीच्या तोंडावर गव्हाऐवजी ज्वारी मिळाल्याने अनेक ठिकाणी सर्वसामान्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. “दिवाळीत तरी गव्हाची भाकरी खाऊ देत नाहीत,” अशी भावना काही लाभार्थ्यांनी व्यक्त केली. मात्र पुरवठा विभागाचे म्हणणे आहे की, “ज्वारी हे पोषक आणि आरोग्यदायी धान्य असून, या निर्णयामुळे पोषणमूल्य वाढेल.”
राज्य शासनाचा हा निर्णय दिवाळीआधी लागू होणार असून, संबंधित जिल्ह्यांतील सर्व शिधापत्रिकाधारकांना त्याचा थेट परिणाम जाणवणार आहे.