
खंडवा मध्यप्रदेश
खंडवा जिल्ह्यात दसऱ्याच्या दिवशी दुर्दैवी घटना घडली. दुर्गामूर्ती विसर्जनावरून परतणाऱ्या भाविकांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर-ट्रॉली गुरुवारी दुपारी नदीत कोसळली. या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण बेपत्ता आहेत.
पंढणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जमालीजवळील अबना नदीत हा अपघात घडला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तासन्तास सुरू असलेल्या बचावकार्यामुळे काहींना वाचवण्यात यश आले. मात्र, मृतांचा आकडा वाढतच गेला.
ट्रॅक्टरचे नियंत्रण सुटले, ट्रॉली २० फूट खोल नदीत कोसळली
पडलफाटा ग्रामपंचायतीतील ग्रामस्थ दुर्गामूर्ती विसर्जन करून परतत होते. यावेळी ट्रॅक्टर चालकाने वाहन कल्व्हर्टवर उभे केले. अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर-ट्रॉली थेट नदीत कोसळली. ट्रॉलीत बसलेले नागरिक ट्रॅक्टरखाली चिरडले गेले.
“आम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना वाचवलं”
गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पाण्यात उड्या मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. प्रशासन मात्र बराच उशिरा घटनास्थळी दाखल झाल्याने संताप उसळला. एसडीआरएफची टीम सायंकाळी ७ नंतर घटनास्थळी पोहोचली, तोपर्यंत गावकरीच मदतकार्य करत होते.
प्रशासनावर निष्काळजीपणाचे आरोप
स्थानिकांचा आरोप आहे की दरवर्षी अर्दला तलाव परिसरात विसर्जनावेळी पोलीस बंदोबस्त असतो. मात्र यंदा कुठलीही सुरक्षा व्यवस्था नव्हती. या दुर्लक्षामुळेच अपघाताचे प्रमाण वाढल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. “प्रशासन वेळीच हजर असते तर इतक्या जणांचे जीव गेले नसते,” असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले
सध्या घटनास्थळी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक उपस्थित आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असून जखमींवर उपचार सुरू आहेत. बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
या अपघातामुळे दसऱ्याचा उत्सव खंडव्यात शोकांतिका ठरला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.