
आग्रा वृत्तसंस्था
विजयादशमीच्या उत्सवाला गुरुवारी एका दुर्दैवी घटनेने गालबोट लागले. आग्रा जिल्ह्यातील डुंगरवाला गावात दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करताना उंटगान नदीत सहा तरुणांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ पसरली असून गावात शोककळा पसरली आहे.
खेरागड पोलीस ठाण्याच्या माहितीनुसार, सकाळपासूनच गावात नदीकाठी दुर्गामूर्ती विसर्जनासाठी मोठी गर्दी जमली होती. दुपारी अडीचच्या सुमारास काही तरुणांनी नदीत उतरून मूर्तीचे विसर्जन सुरू केले. मात्र अचानक पाण्याच्या जोरदार प्रवाहात हे तरुण वाहून गेले. त्यापैकी एकाला स्थानिकांच्या मदतीने वाचवण्यात यश आले, तर उर्वरित सहा तरुणांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य हाती घेतले. स्थानिक नागरिकांनीही यात सहभाग घेतला. बचाव पथक नदीत शोधमोहिम राबवत असून, कुटुंबीय नदीकाठावर देवतेसमोर आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी अश्रूंनी प्रार्थना करत आहेत.
पश्चिम विभागाचे डीसीपी अतुल शर्मा यांनी सांगितले की, विसर्जनासाठी प्रशासनाने पुलाखालून विशेष जागा निश्चित केली होती. परंतु काही लोकांनी नदीच्या मध्यभागी मूर्ती विसर्जनाचा प्रयत्न केला. त्याच वेळी ही दुर्घटना घडली.
या दुर्दैवी घटनेनंतर डुंगरवाला गावात हळहळ व्यक्त होत आहे. आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात अचानक घडलेल्या या अपघाताने दसऱ्याचा सण शोकांतिका ठरला.