
धाराशिव प्रतिनिधी
मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. घरदार, शेतजमीन, पिकं वाहून गेल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अशा स्थितीत आधाराची गरज असताना बँकांकडून कर्जवसुलीच्या नोटिसा पाठवल्या जाऊ लागल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील संचितपूर गावातील तब्बल २७ शेतकऱ्यांना एसबीआय बँकेकडून कर्जफेडीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पावसामुळे शेती उद्ध्वस्त झाल्याने पीकनुकसानीमुळे शेतकऱ्यांकडे कर्जफेडीचा स्रोतच उरलेला नाही. त्यामुळे या नोटिसांमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
“आमचं शंभर टक्के नुकसान झालंय. बँकेला पैसे द्यायचे कुठून आणायचे? सरकारनं सातबारा कोरा करू असं सांगितलं, पण आज आमच्यावरच वसुलीचा तगादा लावला जातोय,” असा उद्विग्न सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
“शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ”
या प्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) आमदार कैलास पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांचं अपरिमित नुकसान झालं. अशा वेळी सरकारनं कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांना आधार द्यायला हवा. उलट त्यांना कर्जवसुलीच्या नोटिसा देऊन जखमेवर मीठ चोळलं जातंय,” अशी टीका त्यांनी केली.
पाटील यांनी सांगितलं की, उद्धव ठाकरे धाराशिव दौऱ्यावर आले असताना शेतकऱ्यांनी नोटिसा दाखवल्या होत्या. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्या नोटिसा गोळा करण्याचे आदेश दिले. “आम्ही सर्व नोटिसा एकत्र करून मुख्यमंत्र्यांना स्पीड पोस्टने पाठवणार आहोत. शेतकऱ्यांना कसं ओरबाडलं जातंय, हे शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी ही भूमिका घेणार आहोत,” असे पाटील म्हणाले.
शेतकरी कर्जमाफीची मागणी सातत्याने होत असतानाच बँकांकडून सुरू असलेल्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांचा आक्रोश अधिक तीव्र होण्याची चिन्हं दिसत आहेत.