स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई – अंधेरी पूर्वच्या मरोळ परिसरात एमआयडीसी पोलिसांनी रविवारी रात्री थरारक कारवाई करून १ कोटी १५ लाख १२ हजार रुपयांचा कोकेन जप्त केला असून, घानाचा ३४ वर्षीय नागरिक हेनरी अलमोह याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. परदेशी ड्रग माफियांना मुंबईत पाय रोवू न देण्याचा पोलिसांचा निर्धार यानिमित्ताने पुन्हा दिसून आला आहे.
रविवार, ११ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास विजयनगर ब्रिजखाली साळवेनगर, मरोळ येथे परदेशी नागरिक ड्रग डिलिव्हरीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचून हेनरी अलमोह याला गजाआड केले.
तपासात पोलिसांना २८७.८० ग्रॅम कोकेन (किंमत ₹१,१५,१२,०००), आयफोन १६ प्रो मोबाईल (किंमत ₹१,३०,०००) आणि सॅमसंग एस२५ अल्ट्रा मोबाईल (किंमत ₹१,४०,०००) असा एकूण ₹१,१७,८२,०५० किमतीचा मुद्देमाल हस्तगत झाला. आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, कोकेनची तस्करीची साखळी उलगडण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
या यशस्वी कारवाईचे श्रेय पोलिस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त सत्यनारायण, अपर आयुक्त परमजीतसिंह दहिया, परिमंडळ-१० चे डीसीपी दत्ता नलावडे, अंधेरी विभागाचे एसीपी गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाला जाते. सपोनि यश पालवे, मसपोनि प्रतिभा पाटील, पोउनि महादेव जगताप, महेंद्र खांगळ यांच्यासह पोलीस हवालदार मंडले, इटकर, नलावडे, जाधव, वाघमारे, देसाई, साळुंखे, भोसले, माळी, पवार यांनी या कारवाईत सिंहाचा वाटा उचलला.
मुंबई पोलिसांच्या या धडक कारवाईने ड्रग माफियांमध्ये खळबळ उडाली असून, पोलिस दलाचे कौतुक होत आहे.


