डोंबिवली प्रतिनिधी
डोंबिवली – डोंबिवलीतील खोणी तळोजा रोडवरील ‘ऑर्चिड को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी’च्या संचालक पदाच्या निवडणुकीत रविवारी अक्षरशः रणकंदन माजलं. बोगस मतदानावरून वाद उसळला आणि त्यानंतर हाणामारी, धक्काबुक्की, अगदी पोलिसांनाही हात घालण्यापर्यंत हा राडा पोहोचला.
कल्याण ग्रामीण हद्दीतील या प्रतिष्ठीत सोसायटीच्या निवडणुकीत गेल्या काही दिवसांपासून चुरस होती. निवडणुकीत कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून मानपाडा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सकाळपासून शांततेत मतदान सुरू होतं; पण शेवटच्या टप्प्यात वादाला पेट बसला.
सूत्रांच्या माहितीनुसार, खोणी ग्रामपंचायत सदस्यांचे पती महेश ठोंबरे यांच्या एका समर्थकाचं मतदान निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद केल्यावर हा गोंधळ सुरू झाला. समर्थकांकडून ठोंबरे यांना फोनवरून कळविण्यात आलं आणि ठोंबरे थेट मतदान केंद्रावर धडकल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर ठोंबरे विरोधी गटाच्या उमेदवारावर धावून गेले, चांगलीच मारामारी झाली आणि त्यात पोलिसांनाही धक्काबुक्कीचा फटका बसला.
सोसायटी निवडणुकीच्या व्हिडिओमध्ये पोलिसांवरच हात उचलल्याचे स्पष्ट दिसत असल्याने संतापाची लाट उसळली आहे. महेश ठोंबरे यांचा गुन्हेगारी इतिहास डोंबिवलीकरांना नवा नाही. यापूर्वीही मानपाडा पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे नोंद आहेत. त्यामुळे नागरिकांनी ठोंबरे आणि संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करत मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.
दरम्यान, या प्रकारात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती समोर आली आहे.


