
चार वेळा निवडणूक लढवली, डझनभर गुन्ह्यांचा इतिहास; पोलिसांवर गोळी झाडून झाली शेवटची वेळ
गोड्डा (झारखंड)
राजकारणातून थेट गुन्हेगारीकडे… आणि शेवट बंदुकीच्या गोळ्यांत! झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यात रविवारी पहाटे झालेल्या पोलिस चकमकीत भाजपचा माजी उमेदवार आणि कुख्यात गुन्हेगार सूर्यनारायण उर्फ सूर्या हंसदा ठार झाला.
गोड्ड्यातील बोरीजोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झिरली समरी टेकडी परिसरात ही धडक कारवाई झाली. पोलिसांच्या मते, हंसदाकडे अपहरण, खून, दरोडा, जाळपोळ अशा डझनभर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. ईसीएल खाणक्षेत्रातील ३०-४० राउंड गोळीबार, हिवा ट्रक जाळणे आणि साहिबगंजमधील पेट्रोल पंपाजवळील हिंसाचार ही त्याच्या अलीकडील कारवायांची उदाहरणं आहेत.
राजकीय कारकीर्द – चार वेळा प्रयत्न, एकदाही विजय नाही
सूर्या हंसदा हा बोरी विधानसभा मतदारसंघातून चार वेळा रिंगणात उतरला. २०१९ मध्ये भाजपने त्याला उमेदवारी दिली होती. मात्र २०२४ मध्ये तिकीट न मिळाल्याने त्याने पक्ष सोडून जेएलकेएमच्या तिकिटावर लढत दिली, पण पराभव ओढवला.
एन्काउंटरचा थरार
रविवारी पोलिसांनी त्याला देवघर येथून अटक केली. त्याच्या कबुलीनंतर गोड्ड्यातील लालमटिया जंगलात लपवलेली शस्त्रे शोधण्यासाठी पथक गेले. तेथे त्याने पोलिसांकडून शस्त्र हिसकावून घेत पळण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार करत त्याला जागीच संपवले.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. गोड्डा आणि साहिबगंज जिल्ह्यांत त्याच्याविरुद्ध यंदाच्या जानेवारीपासून तीन नवे गुन्हे नोंदवले गेले होते.
गुन्हेगारी आणि राजकारणाची सांगड पुन्हा चर्चेत
सूर्या हंसदाचा एन्काउंटर हा झारखंडमध्ये गुन्हेगारी आणि राजकीय प्रभावाची सांगड पुन्हा एकदा अधोरेखित करणारा ठरला आहे. भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणारा आणि नंतर वेगळ्या पक्षात गेलेला हा नेता शेवटी गुन्हेगारीच्या अंधारात गडप झाला.