
प्रतिनिधी, कोल्हापूर
महापुरुषांच्या कोल्हापुरात एक अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. महालक्ष्मीनगर परिसरात राहणाऱ्या ४४ वर्षीय परशराम पाटील यांनी आपल्या पत्नीचा मध्यरात्री निर्घृण खून केल्याने खळबळ उडाली आहे. केवळ पैशांवरून झालेल्या वादातून त्यांनी पत्नीचा आधी गळा आवळला आणि ती मृत झाली नसल्याची खात्री झाल्यावर चाकूने गळा चिरून तिचा जीव घेतल्याची धक्कादायक कबुली आरोपीने पोलिसांसमोर दिली आहे.
हत्या केल्यानंतर पोलिसांना स्वतः फोन करून दिली माहिती
घटनानंतर परशराम यांनी थेट पोलिसांना कॉल करून “मी बायकोचा खून केला आहे” अशी माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या करवीर पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.
वादाची सुरुवात… आणि रक्तरंजित शेवट
मिळालेल्या माहितीनुसार, परशराम आणि अस्मिता पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणींमुळे वाद सुरू होते. मंगळवारी रात्री दोघांमध्ये पैशांवरून जोरदार भांडण झालं. परशराम यांनी अस्मिता यांना विचारलं – “तू एवढं कर्ज कशासाठी घेतेस? पैसे कुणाला देतेस?”
उत्तर समाधानकारक न मिळाल्याने संतप्त झालेल्या परशराम यांनी अस्मिता यांचा गळा आवळला. मात्र, त्या मृत झाल्या नाहीत याची जाणीव होताच त्यांनी चाकूने गळा चिरून तिचा खून केला.
दोन मुलांचं आयुष्य काळोखात…
या दांपत्याला आलोक (२२) आणि पार्थ (२०) अशी दोन मुलं आहेत. रात्री उशिरा घरी परतलेल्या दोघांनी बेडरूमचा दरवाजा बंद असल्याचे पाहून आवाज दिला, पण प्रतिसाद मिळाला नाही. काही वेळातच पोलिस घटनास्थळी आले आणि दरवाजा उघडून त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं.
कर्ज, आर्थिक अडचणी आणि गोपनीय व्यवहारांचा स्फोट
अस्मिता पाटील यांनी काही वर्षांपूर्वी २० लाखांचं कर्ज घेतलं होतं. हे कर्ज फेडण्यासाठी परशराम यांना स्वतःचं घर विकावं लागलं. तेव्हापासून कुटुंब भाड्याच्या घरात राहत होते. शिवणकाम करून घरखर्च भागवणाऱ्या अस्मिता यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या दोन्ही मुलांच्या नावावर प्रत्येकी १ लाखाचे कर्ज फायनान्स कंपनीकडून घेतले होते. ही गोष्ट त्यांनी ना पतीला सांगितली, ना मुलांना बोलू दिलं. हीच माहिती नंतर परशराम यांना समजल्याने त्यांचा संताप अनावर झाला.
पोलिसांचा तपास सुरू
या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. करवीर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून खूनासाठी वापरलेला चाकू जप्त केला आहे. आरोपी परशराम पाटील याच्यावर ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.