कोल्हापूर प्रतिनिधी
घर-संसार, मुलांच्या जबाबदाऱ्या, शिक्षणातील खंड, वयाची अट… इतक्या अडथळ्यांवर मात करत कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी येथील आरती कणिरे यांनी वयाच्या ४०व्या वर्षी पोलिस उपनिरीक्षक पदावर नाव कोरले आहे. प्रबळ इच्छाशक्ती आणि चिकाटीपुढे परिस्थिती नमत जाते, याचा हे उदाहरण म्हणता येईल.

३८९ उमेदवारांच्या बॅचमध्ये सर्व फिजिकल कसोट्या उत्तीर्ण करत आरती कणिरे यांनी राज्यात ५८ वी तर महिलांमधील १४ वी रँक पटकावत इंगळी गावाचे नाव उज्ज्वल केले. गावातील पहिल्या महिला पोलिस अधिकारी म्हणून त्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत.
लग्नानंतर शिक्षणाला विराम… आणि पुन्हा नवी वाट
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आरती कणिरे यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण इंगळी येथेच पूर्ण केले. बारावीनंतर त्यांचे लग्न ठरले आणि शिक्षणाला प्राकृतिक विराम मिळाला. घर-संसार, मुलांची जबाबदारी यांच्यात अनेक वर्षे गेली; परंतु अंतर्मनातील शिकण्याची ओढ कायम राहिली.
पुन्हा शिक्षण घ्यायचा निर्णय घेत त्यांनी दूर शिक्षणातून वाणिज्य शाखेची पदवी पूर्ण केली आणि पुढे एमबीएही संपादन केले. याच काळात मुलगा वैद्यकीय शिक्षण घेत होता.
“मुलगा डॉक्टर होण्यासाठी झटत होता, त्याचवेळी मी स्वतः पदवी-पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत होते,” असे त्यांनी हसत सांगितले.
वयाची अट अडसर; पण हार न मानणारी जिद्द
वयाच्या ३०व्या वर्षी पोलिस सेवा गाठण्याचा निर्धार त्यांनी पक्का केला. वयोमर्यादा आडवी आली; मात्र ईडब्ल्यूएस कोट्यातील सवलतीमुळे संधी प्राप्त झाली आणि वयाच्या ३२व्या वर्षी त्यांची PSI पदासाठी निवड झाली. पण कोरोनामुळे तब्बल पाच वर्षे प्रशिक्षण प्रक्रियेला विलंब झाला.
तरीही अभ्यास, शारीरिक तयारी आणि स्वतःवरील विश्वास कायम ठेवत त्यांनी मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली आणि अखेर वयाच्या ४०व्या वर्षी नाशिक येथे प्रशिक्षणासाठी रुजू झाल्या.
कणखर पाठबळ, पती आणि कुटुंबाची साथ
आरती कणिरे यांच्या प्रवासामागे कुटुंबाचे भक्कम पाठबळ असल्याचे त्या नमूद करतात. शिक्षण पुन्हा सुरू करण्यासाठी पतीने प्रोत्साहन दिले, अभ्यासकाळात मुलांची जबाबदारी स्वतः सांभाळली.
आज मुलगी एमबीबीएस पूर्णत्वास, तर मुलगा पदवी शिक्षण घेत आहे.
माहेर व सासर दोन्ही इंगळीतील असल्याने सासू-सासऱ्यांचे सहकार्यही मोलाचे ठरले. प्रशिक्षणकाळात मुलांचा सांभाळ त्यांनी केला. “घर-संसार आणि अभ्यास दोन्ही शक्य नाही, असे सुरुवातीला म्हटले गेले; पण विश्वास आणि साथ मिळाली, म्हणून हे यश साध्य झाले,” असे आरती कणिरे यांनी सांगितले.
कोल्हापूर विभागात नियुक्ती
नाशिक येथील प्रशिक्षणानंतर आरती कणिरे यांची कोल्हापूर विभागासाठी नियुक्ती निश्चित झाली असून २९ डिसेंबर रोजी त्यांना कार्यस्थळ मिळणार आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी त्यांचा प्रवास आत्मविश्वास देणारा ठरत आहे.


