
नवी दिल्ली वृत्तसंस्था
देशातील रुग्णांना मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ३७ अत्यावश्यक औषधांचे आणि त्यांच्या विविध सूत्रीकरणांचे किरकोळ दर निश्चित करण्यात आले असून, हे दर तत्काळ लागू होतील. रसायने आणि खते मंत्रालयाने औषध (किंमत नियंत्रण) आदेश, २०१३ अंतर्गत शनिवारी अधिसूचना जारी केली आहे.
राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने (NPPA) जारी केलेल्या या आदेशामुळे संसर्ग, हृदयरोग, मधुमेह, जळजळ, जीवनसत्त्वांची कमतरता तसेच जुनाट आजारांवरील महत्त्वाची औषधे आता अधिक परवडणारी होणार आहेत.
कोणत्या औषधांवर लागू होणार नवीन दर?
सरकारच्या नवीन दरयादीत पॅरासिटामोल, एटोरवास्टॅटिन, अमोक्सिसिलिन, मेटफॉर्मिन यांसारख्या लोकप्रिय औषधांसह ३५ हून अधिक फॉर्म्युलेशन्सचा समावेश आहे. यामध्ये—
* एसिक्लोफेनाक + पॅरासिटामोल + ट्रिप्सिन चायमोट्रिप्सिन (दाहक-विरोधी) : डॉ. रेड्डीज – ₹13, कॅडिला – ₹15.01
* अॅटोरवास्टॅटिन ४० मिग्रॅ + क्लोपीडोग्रेल ७५ मिग्रॅ (हृदयरोग) : ₹25.61
* सेफिक्सिम + पॅरासिटामोल सस्पेंशन (मुलांसाठी) : नवीन दर लागू
* कोलेकॅल्सीफेरॉल ड्रॉप्स (व्हिटॅमिन D) आणि डायक्लोफेनाक इंजेक्शन : ₹31.77 प्रति मिली
मधुमेह, कोलेस्टेरॉल व दम्याच्या औषधांचाही समावेश
* एम्पाग्लिफ्लोझिन + सिटाग्लिप्टिन + मेटफॉर्मिन हायड्रोक्लोराइड (टाइप-२ मधुमेह) : ₹16.50 प्रति टॅब्लेट
* एटोरवास्टॅटिन-एझेटिमिब (कोलेस्टेरॉल नियंत्रण)
* बिलास्टिन-मोंटेलुकास्ट (दमा व ऍलर्जी)
दरांमध्ये GST समाविष्ट नाही
एनपीपीएने स्पष्ट केले आहे की जाहीर केलेले दर GST वगळून आहेत. आवश्यक असल्यास उत्पादक कंपन्या GST स्वतंत्रपणे आकारू शकतात. सर्व औषध कंपन्यांना IPDMS प्रणालीद्वारे नवीन किंमत सूची फॉर्म-V मध्ये सादर करून ती राज्य औषध नियंत्रक आणि एनपीपीएला पाठवावी लागेल.
नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
डीपीसीओ-२०१३ व आवश्यक वस्तू कायदा-१९५५ अंतर्गत, नियमांचे उल्लंघन झाल्यास जास्त आकारलेली रक्कम व्याजासह वसूल केली जाईल. किरकोळ विक्रेते व व्यापाऱ्यांनी दुकानांमध्ये सुधारित दरयादी स्पष्टपणे प्रदर्शित करणे बंधनकारक आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, या निर्णयामुळे देशभरात आवश्यक औषधांची उपलब्धता वाढेल, पारदर्शकता येईल आणि रुग्णांना उपचार अधिक परवडणारे ठरतील.