
नवी दिल्ली वृत्तसंस्था
डिजिटल व्यवहारांचा वेगवान प्रसार आणि UPI प्रणालीचा झपाट्याने होणारा वापर लक्षात घेता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) मोठे पाऊल उचलले आहे. 1 ऑगस्ट 2025 पासून UPI व्यवहारांबाबत काही नवे नियम लागू करण्यात येणार असून, हे बदल थेट सर्वसामान्य वापरकर्ते, दुकानदार, फ्रीलांसर आणि व्यवसायिकांवर परिणाम करणारे आहेत.
गुगल पे, फोनपे, पेटीएमसारखी अॅप्स वापरून रोजचे व्यवहार करणाऱ्या नागरिकांनी ही माहिती वेळेत जाणून घेणे अत्यावश्यक ठरणार आहे. अन्यथा पेमेंट करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
काय असणार आहेत हे नवे नियम?
* बॅलन्स तपासणीवर मर्यादा
1 ऑगस्टपासून एकाच अॅपवरून दिवसातून केवळ 50 वेळा बॅलन्स तपासता येणार आहे. दोन अॅप वापरत असल्यास ही मर्यादा स्वतंत्रपणे लागू असेल.
पीक अवर्स – सकाळी 10 ते दुपारी 1 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9:30 दरम्यान बॅलन्स तपासण्याची सुविधा मर्यादित किंवा बंद असणार आहे.
* प्रत्येक व्यवहारानंतर बॅलन्स अपडेट
आता प्रत्येक यशस्वी व्यवहारानंतर बँक तुमच्या खात्याचा उरलेला शिल्लक बॅलन्स SMS किंवा इन-ॲप नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवेल. त्यामुळे वारंवार बॅलन्स तपासण्याची गरज भासणार नाही.
* ऑटो पेमेंट्स गर्दी नसलेल्या वेळेतच
नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम, EMI, SIP यांसारखी ऑटो डेबिट सेवा आता सकाळी 10 वाजण्याआधी, दुपारी 1 ते संध्याकाळी 5 आणि रात्री 9:30 नंतरच पार पडणार आहेत. व्यस्त वेळात हे व्यवहार टाळले जातील.
* फेल किंवा प्रलंबित व्यवहार तपासणीस मर्यादा
कोणताही व्यवहार अयशस्वी किंवा प्रलंबित असेल, तर त्याची स्थिती 90 सेकंदांनंतरच तपासता येणार आहे. दिवसभरात फक्त 3 वेळा ही स्थिती तपासण्याची परवानगी दिली जाईल.
प्रत्येक विनंतीत किमान 45 ते 60 सेकंदांचे अंतर राखावे लागेल.
* बँकांसाठी UPI सिस्टीमचे ऑडिट अनिवार्य
प्रत्येक बँकेला वर्षातून एकदा UPI प्रणालीचे सखोल ऑडिट करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या ऑडिटचा पहिला अहवाल 31 ऑगस्टपर्यंत NPCI कडे सादर करावा लागेल.
याशिवाय, वापरकर्त्यांना आता महिन्याला केवळ 10 वेळा रिव्हर्सल (चार्जबॅक) मागता येणार आहे.
* UPI च्या मूलभूत सुविधा कायम
या नव्या बदलांचा QR कोड स्कॅन करणे, थेट मनी ट्रान्सफर, व्यापारी व्यवहार यासारख्या UPI च्या मूलभूत फिचर्सवर कोणताही परिणाम होणार नाही, हे NPCI ने स्पष्ट केले आहे.
UPI वापरणाऱ्यांनी या बदलांना गांभीर्याने घ्यावे, अन्यथा व्यवहारात अडथळे येऊ शकतात. डिजिटल व्यवहारांचा अनुभव सुरळीत ठेवण्यासाठी वेळेत सवयी बदलण्याचे आवाहन करण्यात आले आहे.