नवी दिल्ली प्रतिनिधी
भारतातील डिजिटल माध्यमांवर वावरणाऱ्या अश्लीलतेला लगाम घालण्याचा निर्धार करत केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने तब्बल २५ अश्लील आणि आक्षेपार्ह अॅप्स व वेबसाइट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या कारवाईमुळे ULLU, ALTT, Big Shots, Desiflix, Boomex यांसारखे चर्चित अॅप्स भारतीय इंटरनेट वापरकर्त्यांसाठी बंद करण्यात आले आहेत.
Storyboard18 च्या अहवालानुसार, या प्लॅटफॉर्म्सवर अश्लील आणि कायद्याच्या चौकटीबाहेरच्या जाहिराती व सामग्री प्रसारित केली जात होती. यामुळे इंटरनेट सेवा प्रदात्यांना (ISPs) या लिंक्सवर भारतात सार्वजनिक प्रवेश तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या अॅप्सची यादी – तुमच्या मोबाईलमध्येही आहे का हे तपासा?
सरकारच्या बंदी आदेशात खालील अॅप्स व वेबसाइट्सचा समावेश आहे:
ULLU, ALTT, Big Shots, Desiflix, Boomex, Navarasa Lite, Gulab app, Kangan app, Bull app, Jalva app, Wow Entertainment, Look Entertainment, Hitprime, Feneo, ShowX, Sol Talkies, Adda TV, HotX VIP, Hulchul app, MoodX, NeonX VIP, Fugi, Mojflix, Triflicks
कायदेशीर कारवाईचा आधार
या प्लॅटफॉर्म्सवर माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० चे कलम ६७ आणि ६७A, भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम २९४ आणि अश्लील प्रदर्शन (प्रतिबंध) कायदा, १९८६ च्या कलम ४ चे उल्लंघन झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
IT नियम 2021 अंतर्गत मध्यस्थ (intermediaries) या बेकायदेशीर माहितीवर तात्काळ कारवाई करण्यास बांधील आहेत. तसे न केल्यास कलम ७९(१) अंतर्गत मिळणारे संरक्षण रद्द केले जाईल व गुन्हेगारी कारवाईचा सामना करावा लागेल, असा इशाराही सरकारने दिला आहे.
अवैध जुगार अॅप्सवरही बंदीचा घाव
फक्त अश्लीलतेपुरतेच नव्हे, तर अवैध जुगार व गेमिंग अॅप्सवरही सरकारने कडक कारवाई केली आहे. २०२२ ते जून २०२५ या कालावधीत तब्बल १,५२४ अॅप्स व वेबसाइट्सवर बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी संसदेत दिली.
परदेशी गेमिंग कंपन्यांना भारतात कामकाज सुरु ठेवण्यासाठी IGST अंतर्गत नोंदणी अनिवार्य आहे. २८ टक्के GST लावण्याचे धोरणही स्पष्ट करण्यात आले आहे.
सरकारचा कडक संदेश – नैतिकतेशी तडजोड नाही
या निर्णयामुळे भारत सरकारने डिजिटल क्षेत्रात नैतिकता, कायद्यानुरूपता आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला प्राधान्य असल्याचे पुन्हा अधोरेखित केले आहे.
अश्लीलता, अनैतिक जाहिराती आणि अवैध जुगाराच्या माध्यमातून समाजमन बिघडवणाऱ्या अॅप्सना बंदीची शिक्षा अनिवार्य होती, अशी प्रतिक्रिया तज्ञांकडून येत आहे.
ही कारवाई म्हणजे डिजिटल माध्यमांवरील स्वैराचाराविरोधातील सरकारची ठोस पावले असल्याचे मत अनेक तज्ज्ञांनी नोंदवले आहे.


