
नवी दिल्ली वृत्तसंस्था
मराठी माणसावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबे यांना अखेर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मराठी बाणा काय असतो, याचा प्रत्यक्ष धडा बसला. काँग्रेसच्या महिला खासदारांनी संसद भवनाच्या लॉबीत दुबेंना घेरत जाब विचारला आणि *’जय महाराष्ट्र’*च्या गर्जना करत धारेवर धरले. बिथरलेले दुबे हात जोडून “आप मेरी बहन हो” म्हणत थेट तेथून काढता पाय घेताना दिसले!
“मराठी माणसाला पटक पटके?” – महिला खासदारांचा कडाडून सवाल
निशिकांत दुबे यांनी काही दिवसांपूर्वी, “कुत्ता भी अपनी गली में शेर होता है. महाराष्ट्र के बाहर आओ, पटक पटक के मारेंगे” अशी मराठी जनतेविरोधात घृणास्पद भाषा वापरली होती. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सडेतोड प्रत्युत्तर देत, “तू मुंबईत ये, तुला समुद्रात ‘डुबे डुबे’ के मारेंगे” असा इशारा दिला होता.
दरम्यान, लोकसभेचे कामकाज काही वेळ स्थगित झाल्यानंतर लॉबीत उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर व शोभा बच्छाव यांनी दुबेंना घेरत तीव्र शब्दांत जाब विचारला. “मराठी माणसाविरोधात अशी अरेरावी कशी करू शकता?” या प्रश्नांनी गडबडलेले दुबे लगेच हात जोडू लागले. गायकवाड यांनी ‘जय महाराष्ट्र’ची घोषणा दिल्यानंतर दुबे सरळ मागे फिरले आणि लॉबीमधून पळ काढला.
दुबेंना सर्वपक्षीय चपराक बसणार?
दुबेंच्या वक्तव्यावर आता संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचा सूर उमटत असून, सर्वपक्षीय एकजूट दिसू लागली आहे. काँग्रेसच्या महिला खासदारांनी जे धाडस दाखवले, त्यात आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व मनसे या पक्षांचे खासदारही सामील होण्याची शक्यता आहे.
मराठीसाठी आवाज बुलंद!
मराठी भाषेच्या सक्तीवरून सरकारने जीआर रद्द केला असला, तरी निशिकांत दुबेंच्या विधाने मराठी अस्मितेला हात घालणारी असल्याने राजकीय वादळ उठले आहे. “मुंबईत मराठी भाषिक अल्पसंख्याक आहेत,” असे वक्तव्य करत दुबेंनी आकड्यांचा खेळ मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, मराठी जनतेच्या आत्मसन्मानावर घाव घालणाऱ्या या विधानांना आता एकमुखी विरोध होतो आहे.
मराठी माणूस गप्प बसणार नाही!
राजकीय पटलावर मराठी अस्मितेचा आवाज पुन्हा एकदा बुलंद झाला आहे. संसद भवनात दुबेंना मिळालेला चपराक हा केवळ सुरुवात आहे. महाराष्ट्राच्या विविध पक्षांचे खासदार आता एकत्र येत दुबेंना कायमचा धडा शिकवण्याच्या तयारीत आहेत.