यवतमाळ प्रतिनिधी
महागाव तालुक्यातील वाडी (वाकोडी) परिसरात गुरुवारी सकाळी वाळू माफियांच्या दहशतीने थरकाप उडाला. पुस नदीपात्रातून सुरू असलेली बेकायदा वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या महागाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक व एका शिपायावर सहा वाळू तस्करांनी प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली. जीवावर बेतल्याने उपनिरीक्षकांनी हवेत गोळीबार केला. या घटनेत पोलीस उपनिरीक्षकांसह एक वाळू तस्कर जखमी झाला.
सुनील अंबुरे असे जखमी उपनिरीक्षकांचे नाव आहे. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर अंबुरे हे एका शिपायासह दुचाकीवरून वाडी गावात दाखल झाले. भर चौकात ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक सुरू असल्याचे दिसताच त्यांनी कारवाईचा प्रयत्न केला. मात्र याच वेळी सहा वाळू तस्करांनी अंबुरे यांना घेरून सिमेंटच्या विटा व दगडांनी अमानुष मारहाण सुरू केली. परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती.
जीव वाचवण्यासाठी अंबुरे यांनी रिव्हॉल्वर काढून दोन राऊंड फायर केले. पहिली गोळी एका तस्कराच्या खांद्याला लागली. त्यानंतर झटापटीदरम्यान तस्करांनी रिव्हॉल्वर हिसकावण्याचा प्रयत्न केल्याने दुसरी गोळी सुटून ती थेट अंबुरे यांच्या डाव्या तळहातात घुसली. गोळीबाराचा आवाज ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. याच गोंधळाचा फायदा घेत वाळू माफिया ट्रॅक्टरसह पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मोरथ येथील स्मशानभूमी परिसरात लपून बसलेल्या तीन तस्करांना पोलिसांनी अटक केली असून उर्वरित तिघे फरार आहेत. जखमी उपनिरीक्षक सुनील अंबुरे यांच्या हातावर रात्री पुसद येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, महागाव तालुक्यात रात्री दहा नंतर वाळू माफियांचा सशस्त्र वावर वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक कुमार चिंत यांनी महागाव पोलीस ठाण्याला भेट देऊन पाहणी केली. वाळू तस्करीविरोधातील कारवाईबाबत बोलताना त्यांनी, वाळू माफियांवर कारवाई करणे ही केवळ पोलिसांचीच नव्हे तर महसूल विभागाचीही संयुक्त जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


