मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील वांद्र्याच्या दरगाह गली परिसरात ड्रग्जच्या तस्करीवरून झालेल्या वादातून एका व्यक्तीचा अत्यंत अमानुष खून करण्यात आला. गुरुवारी रात्री काही आरोपींनी शाकीर अली सेंडोले यांच्या घरात घुसून त्यांच्यावर तलवार आणि अन्य धारदार शस्त्रांनी वार केले. हल्ला इतका क्रूर होता की आरोपींनी त्यांच्या आतड्याही बाहेर काढल्या आणि डोके ठेचले. यामध्ये शाकीर यांचा मृत्यू झाला असून त्यांची भावजय शिरीन आणि भाचा अफजल हे गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी या प्रकरणी इम्रान पठाण, त्याची पत्नी फातिमा उर्फ कायनात, उस्मान जाकिर अली आणि जाकिर अली सेंडोले या चौघांना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की हे आरोपी यापूर्वीही गुन्ह्यांत सामील होते. आणि ड्रग्ज सप्लाय करत होते.
मृतक शाकीर यांच्या बहिणीने सांगितले की तिचा भाऊ परिसरात ड्रग्ज विरोधात उभा राहिला होता. आणि त्यामुळेच त्याच्यावर हे प्राणघातक हल्ले झाले. तिने सलमान मलिक आणि त्याची पत्नी सोनी पठाण यांच्यावर हल्ल्याचे सूत्रधार असल्याचा आरोप केला असून, यापूर्वीही त्यांनी कुटुंबाला धमक्या दिल्याचे सांगितले.
सध्या पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून, आणखी काही आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


