नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नीट, सीयूईटी आणि सीबीएसईसह विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांच्या आयोजनाबाबत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ या समूहाने केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन जाहीर केले असून, सामाजिक व पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.
IF NOT US, WHO?
IF NOT NOW, WHEN !
I will be joining the CJP members in Delhi on 6th June if nothing changes by 5th June. Any self respecting Minister should resign if things go so wrong… Not to mention the effect on millions of young lives and in fact the future of India.… pic.twitter.com/A6XswLSs12— Sonam Wangchuk (@Wangchuk66) June 2, 2026
वांगचुक यांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये परीक्षा व्यवस्थापनातील वारंवार उद्भवणाऱ्या प्रश्नांबाबत चिंता व्यक्त केली. शिक्षण क्षेत्राशी संबंधित गंभीर मुद्द्यांवर जबाबदारी निश्चित होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सरकारकडून या संदर्भात ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर आंदोलनात सहभागी होण्याचा विचार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दीपके यांनी काही दिवसांपूर्वी एका प्रभावी व्यक्तीचा पाठिंबा मिळाल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर वांगचुक यांचा व्हिडिओ समोर आला. दीपके यांच्याशी चर्चा केल्यानंतर आंदोलनाशी संबंधित माहिती आणि आकडेवारीचा अभ्यास केल्याचे वांगचुक यांनी सांगितले.
या संदर्भात बोलताना त्यांनी हा प्रश्न केवळ नीट, सीयूईटी किंवा सीबीएसई परीक्षांपुरता मर्यादित नसून देशाच्या एकूण शिक्षण व्यवस्थेशी संबंधित असल्याचे अधोरेखित केले. गेल्या अनेक दशकांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना ग्रामीण व दुर्गम भागातील शैक्षणिक गुणवत्तेच्या प्रश्नांशी सातत्याने सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
नवीन शैक्षणिक धोरण आणि ‘विकसित भारत’सारख्या संकल्पना सकारात्मक असल्या, तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक असल्याचे वांगचुक म्हणाले. मूलभूत शिक्षण व्यवस्था सक्षम झाली नाही, तर २०४७ पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करणे कठीण ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
परीक्षा प्रक्रियेत सातत्याने गोंधळ होत असल्यास संबंधित यंत्रणांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी अपेक्षा व्यक्त करत पंतप्रधानांनी या विषयात लक्ष घालून शिक्षण व्यवस्थेतील उत्तरदायित्व सुनिश्चित करावे, अशी मागणी त्यांनी केली. या पार्श्वभूमीवर शिक्षण व्यवस्था, परीक्षा नियोजन आणि प्रशासनिक जबाबदारी यांबाबतची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.


