मुंबई प्रतिनिधी
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे होणाऱ्या परिषदेच्या ११७ व्या कार्यकारी समिती बैठकीत त्या पदभार स्वीकारणार आहेत. या निवडीमुळे मुंबईसह महाराष्ट्राच्या नागरी प्रशासन क्षेत्रातील प्रतिनिधित्वाला राष्ट्रीय स्तरावर नवे स्थान मिळाले आहे.
अखिल भारतीय महापौर परिषदेच्या कार्यकारी समितीची बैठक ३ व ४ जून रोजी ऋषिकेश येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीचे उद्घाटन पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते होणार असून केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर तसेच उत्तराखंडचे नागरी विकास मंत्री रामसिंह केडा यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. देशभरातील प्रमुख शहरांचे महापौर आणि उत्तराखंडमधील विविध महानगरांचे महापौर या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
परिषदेच्या सर्व सदस्यांनी एकमताने तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून कार्यकारी समितीच्या बैठकीत त्यांच्या नियुक्तीची औपचारिक घोषणा केली जाणार आहे. उपाध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल.
यापूर्वी महाराष्ट्र महापौर परिषदेच्या पदसिद्ध अध्यक्षपदाची धुरा स्वीकारलेल्या तावडे यांना आता राष्ट्रीय स्तरावरही महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे मुंबईच्या महापौरपदाच्या माध्यमातून राज्याचे प्रतिनिधित्व अधिक प्रभावीपणे होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सन १९६२ मध्ये स्थापन झालेली अखिल भारतीय महापौर परिषद ही देशातील महापौरांचे प्रमुख व्यासपीठ मानली जाते. नवी दिल्ली येथे मुख्यालय असलेल्या या संस्थेचे सुमारे २४० महापौर सदस्य असून कार्यकारी समितीत ६० सदस्यांचा समावेश आहे. महापौरांच्या अधिकार, जबाबदाऱ्या, नागरी समस्यांवरील उपाययोजना आणि शासनस्तरावरील पाठपुरावा यांसंदर्भात परिषद महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते.
सध्या रेणुबाला गुप्ता या परिषदेच्या अध्यक्षपदी कार्यरत असून त्यांचा कार्यकाळ सप्टेंबर २०२५ पासून सुरू झाला आहे. रितू तावडे यांच्या निवडीमुळे महाराष्ट्राच्या नागरी नेतृत्वाला राष्ट्रीय पातळीवर आणखी बळ मिळाल्याचे मानले जात आहे.


