कल्याण प्रतिनिधी
कल्याण पश्चिमेतील प्रेम ऑटो ते विठ्ठलवाडीदरम्यान प्रस्तावित चार पदरी उड्डाणपुलाच्या कामासाठी अडथळे हटविण्याच्या कारवाईवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. वालधुनी परिसरातील बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेवर महापालिकेने केलेल्या कारवाईदरम्यान बुद्धविहार, स्तूप आणि अन्य धार्मिक-सामाजिक संरचनांची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप फाउंडेशनने केला असून, याविरोधात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मात्र, ही कारवाई नियमानुसार आणि पूर्वसूचनेनंतरच करण्यात आल्याचा दावा कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने केला आहे.
भाजपा के नेता पूरी दुनिया में जाके बुद्ध का ढिंढोरा पीटते हैं। कहते हैं कि बुद्ध के देश से आया हूं।
विडियो महाराष्ट्र का बताया जा रहा है , बुद्ध विहार को हटाने लिये बुलडोजर भेजा गया है। pic.twitter.com/U9eMkdkOa4— Dr. Om Sudha (@dromsudhaa) May 31, 2026
उड्डाणपूल प्रकल्पासाठी आवश्यक जागेवरील अतिक्रमणे आणि इतर अडथळे हटविण्याची मोहीम महापालिकेकडून सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून वालधुनी येथील बुद्धभूमी फाउंडेशनच्या परिसरात कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन आणि घोषणाबाजी सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. संबंधित जमीन महापालिकेच्या मालकीची असून त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कारवाईपूर्वी आवश्यक नोटिसा बजावण्यात आल्या होत्या आणि फाउंडेशनच्या प्रतिनिधींशी अनेक वेळा चर्चा करण्यात आली होती, असेही त्यांनी नमूद केले.
कारवाईदरम्यान परिसरातील गौतम बुद्धांच्या चार मूर्ती आणि अन्य साहित्य सुरक्षितपणे फाउंडेशनच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. फाउंडेशनच्या काही मागण्या असल्यास त्यावर चर्चेसाठी प्रशासन सकारात्मक असल्याचेही गोयल यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बुद्धभूमी फाउंडेशनने प्रशासनाचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता तीन बुद्धमूर्ती, तीन बौद्ध स्तूप, भीमा-कोरेगाव विजयस्तंभाची प्रतिकृती, पंचशील धम्मध्वज, भिक्खू निवास, धर्मशाळा, मैत्रेय बुद्ध विहार तसेच परिसरातील वृक्ष आणि शेतीची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप फाउंडेशनने केला आहे.
या कारवाईमुळे बौद्ध समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा दावा करत फाउंडेशनने महापालिका आयुक्त, संबंधित अधिकारी, पोलीस प्रशासन तसेच उड्डाणपूल प्रकल्पाशी संबंधित खासगी कंपनीच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
उड्डाणपूल प्रकल्पाच्या अनुषंगाने सुरू झालेला हा वाद आता धार्मिक आणि सामाजिक संवेदनशीलतेच्या मुद्द्याशी जोडला गेला असून, प्रशासन आणि आंदोलनकर्ते यांच्यातील मतभेद अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. पुढील काही दिवसांत या प्रकरणाकडे प्रशासन आणि सामाजिक संघटनांचे लक्ष लागले आहे.


