पुणे प्रतिनिधी
देशातील नामांकित भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (आयआयटी) प्रवेशासाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी जेईई ॲडव्हान्स परीक्षा २०२६ चा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. आयआयटी रूरकीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या निकालाकडे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. निकालानंतर यंदा देशातील हजारो विद्यार्थ्यांनी आयआयटी प्रवेशाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
या परीक्षेत आयआयटी दिल्ली झोनमधील शुभम कुमार यांनी घवघवीत यश मिळवत देशात पहिला क्रमांक पटकावला. शुभम यांनी ३६० पैकी तब्बल ३३० गुण मिळवत अव्वल स्थान मिळवले. विशेष म्हणजे मुलींमध्ये आरोही देशपांडे यांनी ३६० पैकी २८० गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
यंदाच्या जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी पेपर एक आणि पेपर दोन मिळून एकूण १ लाख ८७ हजार ३८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ७९ हजार ६९४ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली, तर ५६ हजार ८८० विद्यार्थी पात्र ठरले आहेत. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये १० हजार १०७ मुलींचा समावेश असून, हा आकडा आयआयटी प्रवेश प्रक्रियेत मुलींचा वाढता सहभाग दर्शवणारा मानला जात आहे.
यंदाच्या निकालात महाराष्ट्रासाठीही अभिमानाची बाब ठरली आहे. आयआयटी मुंबई झोनमधील विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली असून, देशातील टॉप टेनमध्ये बी जयकृष्ण श्रीनिवास यांनी ३६० पैकी ३१४ गुणांसह सहावा क्रमांक मिळवला. तर कनिष्क जैन यांनी ३१३ गुणांसह आठवे स्थान पटकावले.
निकालानुसार विद्यार्थ्यांमध्ये वाढती स्पर्धा आणि सातत्यपूर्ण तयारीचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. कठोर अभ्यास, वेळेचे नियोजन, संकल्पनांवरील पकड आणि सातत्य या गुणांच्या बळावर विद्यार्थ्यांनी यंदाही आपले स्वप्न साकार करण्याच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे.
जेईई ॲडव्हान्स निकालातील महत्त्वाची आकडेवारी
तपशील| नोंदणी| परीक्षा दिलेले| पात्र
विद्यार्थी| १,४४,२७६| १,३९,१३१| ४६,७७३
विद्यार्थिनी| ४३,११२| ४०,५६२| १०,१०७
तृतीयपंथी| ०१| ०१| ०
देशातील टॉप १० विद्यार्थी
1. शुभम कुमार – ३३०
2. कबीर छिल्लर – ३२९
3. जतिन चहार – ३१९
4. मोहित शुक्ला – ३१९
5. कुची संदीप – ३१८
6. बी जयकृष्ण श्रीनिवास – ३१४
7. अर्णव गौतम – ३१४
8. कनिष्क जैन – ३१३
9. मेडिसेट्टी नागा सहर्ष – ३१२
10. दर्श सिक्का – ३११
निकाल जाहीर होताच देशभरातील विद्यार्थी आणि पालकांकडून यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला असून, आता पुढील टप्प्यातील आयआयटी प्रवेश प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


