पुणे प्रतिनिधी
पुण्यातील बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांच्या घरात झालेल्या कथित जल्लोषाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या अश्विनी कोष्टा हिच्या वडिलांनी या प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया देत, “दोघांचा जीव घेऊन हे लोक सेलिब्रेशन करत आहेत. आरोपींचा जामीन तातडीने रद्द करून त्यांना पुन्हा तुरुंगात टाकले पाहिजे,” अशी मागणी केली आहे.
#WATCH | 2024 Pune Porsche crash case | Jabalpur, MP: On bail to the juvenile accused and viral video of celebration by his family, Suresh Koshta, father of Ashwini – one of the deceased, says, "It must be a practice in their society to kill two people and then celebrate…They… pic.twitter.com/BcZ8sikInJ
— ANI (@ANI) May 27, 2026
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विशाल अग्रवाल आणि त्यांच्या पत्नीला “मुंबई से आया मेरा दोस्त” या गाण्यावर नाचताना पाहायला मिळत आहे. त्यांच्या गळ्यात नोटांचे हार घातलेले दिसत असून कुटुंबीय आनंदोत्सव साजरा करत असल्याचे दृश्य समोर आले आहे. एका नातेवाईकाने विशाल अग्रवाल यांना उचलून घेतल्याचेही व्हिडिओत दिसते. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
“कायद्याचा धाक उरलेला नाही”
अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या अश्विनीच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. “दोन निष्पापांचा जीव गेला आणि त्यानंतर आरोपींच्या कुटुंबाकडून पार्टी केली जाते, ही अत्यंत असंवेदनशील बाब आहे. सामान्य माणसासाठी कायदा कठोर असतो; मात्र पैशांच्या जोरावर काही लोकांना कायद्यापासून सुटका मिळते,” असे ते म्हणाले.
19 मे 2024 रोजी दारुच्या नशेत पोर्शे कारने दोघांचा जीव घेणारा हा दिवटा आणि त्याने केलेले कांड लपवण्यासाठी संपूर्ण सिस्टीम विकत घेण्याचा प्रयत्न करणारे आई बाप..जेल मधून बाहेर येताच अगरवाल फँमीलीचे जंगी सेलिब्रेशन..नोटांचे हार, डान्स, संगीत आणि माज..@PuneCityPolice @CPPuneCity pic.twitter.com/QEmfiUEQIB
— Archana More-Patil (@Archana_Mirror) May 27, 2026
ते पुढे म्हणाले, “लोकांच्या मनात कायद्याची भीती राहिली नाही. एखाद्याला न्यायालय शिक्षा देते, पण पुढे जामीन मिळतो आणि आरोपी मोकाट फिरतात. त्यामुळे गुन्हेगारांना प्रोत्साहन मिळत आहे. कठोर शिक्षा आणि कडक कायदे लागू झाले तरच अशा घटनांना आळा बसेल.”
“जामीन रद्द करून पुन्हा अटक करा”
विशाल अग्रवाल यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर झालेल्या कथित सेलिब्रेशनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कोष्टा कुटुंबाने न्यायव्यवस्थेकडे कठोर भूमिका घेण्याची मागणी केली आहे. “अशा प्रकारे जल्लोष करणाऱ्यांचा जामीन रद्द झाला पाहिजे. आरोपींच्या आई-वडिलांनाही तुरुंगात टाकले पाहिजे. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले तरी त्यांना जामीन मिळू नये,” अशी मागणी त्यांनी केली.
नेमकं काय आहे पोर्शे अपघात प्रकरण?
मे २०२४ मध्ये पुण्यातील कल्याणीनगर परिसरात भरधाव वेगातील पोर्शे कारने दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अल्पवयीन मुलगा कार चालवत असल्याचा आरोप करण्यात आला होता. घटनेनंतर पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
तपासादरम्यान आरोपीला पोलिसांकडून विशेष वागणूक दिल्याचे आरोप झाले. तसेच, आरोपीला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील रक्तनमुने बदलल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला होता. या प्रकरणात विशाल अग्रवाल, त्यांचे वडील सुरेंद्र अग्रवाल तसेच काही वैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधातही कारवाई करण्यात आली होती.
दरम्यान, अल्पवयीन आरोपीला सुरुवातीला जामीन मिळाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त झाला होता.


