अहिल्यानगर प्रतिनिधी
महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला नवी दिशा देणारे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) विस्तारित राज्य कार्यकारिणीचे तीन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन येत्या ५ ते ७ जूनदरम्यान अहिल्यानगर शहरात आयोजित करण्यात आले आहे. राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या अधिवेशनाच्या नियोजनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून तयारीला वेग आला आहे.
अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील अभियंता भवन येथे सेवानिवृत्त पोलिस उपायुक्त तथा जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बुधवंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. ज्येष्ठ नेते बाबा आरगडे, जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड, जिल्हा प्रधान सचिव विनायक सापा, सोशल मीडिया जिल्हा कार्यवाह सुखदेव फुलारी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत बोलताना बाबासाहेब बुधवंत यांनी अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी संघटितपणे काम करण्याचे आवाहन केले. “अहिल्यानगर शहरातील बडीसाजन मंगल कार्यालयात होणारे हे अधिवेशन राज्यभरातील कार्यकर्त्यांसाठी विचारमंथनाचे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला अधिक बळ देण्यासाठी प्रत्येकाने सक्रिय योगदान द्यावे,” असे त्यांनी सांगितले.
जिल्हा प्रधान सचिव विनायक सापा यांनी अधिवेशनाच्या आयोजनासाठी लागणारा खर्च, निधी संकलन मोहीम, निवास व भोजन व्यवस्था, स्वागत नियोजन आणि स्वयंसेवकांच्या जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर माहिती दिली. राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने प्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
यावेळी सुखदेव फुलारी, भाऊसाहेब सावंत आणि भारतभूषण भागवत यांनी अधिवेशन अधिक प्रभावी आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी विविध सूचना मांडल्या. अधिवेशनादरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन, संविधान मूल्ये, सामाजिक प्रबोधन आणि युवकांचा सहभाग या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
बैठकीस कार्याध्यक्ष भारत आरगडे, भाऊसाहेब सावंत, चिमाजी धनवडे, मल्हारी खेडकर, मेधा झावरे, गौरी गुरव, ठकाजी जगधने, शशिकांत तांबे, रामहरी घुले, विनायक ताकपेरे, सतीश केदार, अनुराधा मामडयाल, तन्वी मामडयाल, अनिता मामडयाल, आदित्य मामडयाल, अण्णासाहेब ढोबळे, अनिता सापा, निता भागवत, किरण जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यातील सामाजिक आणि वैचारिक चळवळींसाठी महत्त्वपूर्ण मानले जाणारे हे अधिवेशन अहिल्यानगरच्या सामाजिक व वैचारिक वातावरणाला नवी उर्जा देणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


