अहिल्यानगर प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात उघडकीस आलेल्या बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरणाने राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र शाखेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र कुटे यांना पोलिसांनी अटक केली असून, या रॅकेटचे धागेदोरे पुण्यापर्यंत पोहोचल्याची माहिती तपासातून पुढे येत आहे.
पिंपरी निर्मळ (ता. राहाता) परिसरातील निळवंडे कालव्यालगत असलेल्या एका बंद खोलीत गुप्तपणे गर्भलिंग निदान केले जात असल्याची माहिती श्रीरामपूरचे अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. त्यानुसार २९ एप्रिल रोजी पोलिसांनी आरोग्य विभाग आणि पीसीपीएनडीटी पथकाच्या मदतीने संयुक्त कारवाई करत छापा टाकला. या कारवाईत डॉ. राहुल भनगे आणि अभिजित भुसाळ यांना पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे २४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.
या कारवाईनंतर तपास अधिक गतीने सुरू करण्यात आला. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल कॉल डिटेल्स आणि आर्थिक व्यवहारांच्या आधारे पोलिसांनी प्रदीप भाऊसाहेब ढगे (रा. कोऱ्हाळे) आणि निलेश ज्ञानेश्वर भवर (रा. नपावाडी) या दोघा एजंटांना अटक केली. प्राथमिक चौकशीत या दोघांनी डॉ. रवींद्र कुटे यांचे नाव उघड केले. त्यानंतर पोलिसांनी डॉ. कुटे यांना ताब्यात घेत अटक केली.
राहाता न्यायालयात हजर करण्यात आलेल्या डॉ. कुटे आणि दोन्ही एजंटांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान या रॅकेटमध्ये आणखी काही डॉक्टर, दलाल आणि मध्यस्थांचा सहभाग समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
‘एजंट’मार्फत गर्भवती महिलांपर्यंत पोहोच
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी एजंट हे गर्भवती महिला आणि डॉक्टर यांच्यातील दुवा म्हणून कार्यरत होते. ठराविक रकमेत गर्भलिंग निदान करून देण्याचे व्यवहार गुप्तपणे केले जात होते. प्रदीप ढगे याच्याकडून पोलिसांनी आणखी एक सोनोग्राफी मशीन जप्त केले असून, या मशीनचा वापर अन्य ठिकाणीही करण्यात आल्याचा संशय आहे.
पुणे कनेक्शनची चौकशी
या प्रकरणाचे धागेदोरे पुण्यापर्यंत पोहोचल्याने तपासाचा व्याप वाढला आहे. पुण्यातील काही डॉक्टर आणि दलाल या रॅकेटशी संबंधित असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्या अनुषंगाने विशेष पथक समांतर तपास करत असून, आर्थिक व्यवहार, मोबाईल संपर्क आणि प्रवास नोंदींची पडताळणी सुरू आहे.
विशेष म्हणजे, गर्भलिंग निदानासाठी आलेल्या महिलांच्या कुटुंबीयांनाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात येत असून, काहींना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
डॉ. रवींद्र कुटे हे वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित नाव मानले जाते. ते २०२२-२३ या कालावधीत आयएमए महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष होते. याशिवाय सदस्यता समितीचे अध्यक्ष, कॉलेज ऑफ जनरल प्रॅक्टिशनर्स (सीजीपी) महाराष्ट्रचे संचालक तसेच आयएमए अॅकेडमी ऑफ मेडिकल स्पेशालिटीजचे राज्याध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.
२०१५ मधील ‘मस्तकॉन’ अधिवेशनात त्यांना ‘प्रशंसा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी आरोग्य जनजागृती आणि डॉक्टरांच्या हक्कांसाठी सक्रिय भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांच्या अटकेमुळे वैद्यकीय वर्तुळात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.
‘बडे मासे’ जाळ्यात अडकण्याची शक्यता
राज्यातील गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही अलीकडील काळातील मोठी कारवाई मानली जात आहे. पोलिस कोठडीदरम्यान आरोपींकडून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता असून, या रॅकेटमागील आर्थिक साखळी आणि वैद्यकीय नेटवर्क उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


