रणजित मस्के, प्रतिनिधी
अहिल्यानगर : श्रीरामपूर तालुक्यातील ऐनतपुर परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार आणि पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे तसेच पोलीस हवालदार पंकज व्यवहारे, भगवान थोरात आणि विशाल तनपुरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
२५ मे रोजी पथक श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना ऐनतपुर गावच्या शिवारात विटकरी रंगाच्या टेम्पोतून चोरून वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने टेम्पो अडवून चालकाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव आकाश नाना निकम (वय २१, रा. आटवाडी, बेलापूर ता. श्रीरामपूर) असे सांगितले. त्याच्याकडे वाळू वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.
कारवाईदरम्यान आरोपीच्या ताब्यातून २० हजार रुपये किमतीची २ ब्रास वाळू आणि ५ लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा टेम्पो असा एकूण ५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यात कुठेही अवैध धंदे सुरू असल्यास नागरिकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या ०२४१-२४१६१११ या क्रमांकावर किंवा डायल ११२ वर माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


